राज्यात करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असताना करोनाच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर देखील आता मास्क सक्तीपासून मुक्ती मिळणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आणि बाधितांचं प्रमाण देखील कमी झाल्यामुळे राज्यात मास्क लावण्याचं बंधन हटवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात एका पत्रकार परिषदेत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भातल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
गुरुवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील करोनाच्या परिस्थितीविषयी आणि संबंधित निर्बंधांविषयी देखील चर्चा झाली. यावेळी मास्कविषयीच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मास्कविषयीचा मुद्दा स्पष्ट केला आहे.
मास्कमुक्ती हा गैरसमज!
मास्कसक्तीपासून मुक्ती मिळेल हा गैरसमज असल्याचं यावेळी आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं. “आपण हा गैरसमज काढून टाकला पाहिजे की मास्कची सक्ती हटवण्यात येईल. आत्तापर्यंत आपण जे काही निर्णय घेतलेत ते सगळे डॉक्टर्स, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं अजूनही ही करोनाची साथ संपलीये असं कुठेही जाहीर केलेलं नाही. ओमायक्रॉनचा कोणताही व्हेरिएंट हा सौम्य किंवा गंभीर आहे असंही सांगितलेलं नाही. कारण व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. मी एकच सांगू शकेन की जर आपल्याला स्वत:ला वाचवायचं असेल, तर आत्तापर्यंतचं सर्वात चांगलं शस्त्र हे मास्क आहे”, असं आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.
दरम्यान, करोनाविषयीच्या निर्बंधांबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मास्कविषयी सूतोवाच केले होते. “इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड, युरोपीय राष्ट्रांमध्ये, अमेरिकेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आलेली आहे, निर्बंध कमी केले आहेत. पण भारताचा विचार केला तर करोनासोबत जगण्यासाठी आता नवी नियमावली बनवायला हवी”, अशी अपेक्षा राजेश टोपेंनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मास्कविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.