Aaditya Thackeray Speaks on Disha Salian Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या दिशा सालियनचा २०२० साली मृत्यू झाला. दिशानं आत्महत्या केल्याचा दावा तेव्हा करण्यात आला. मात्र, त्याचबरोबर तिची हत्या झाल्याचाही आरोप करण्यात आला. एकीकडे तपास यंत्रणांकडून झालेल्या तपासात अशी शक्यता फेटाळून लावण्यात आली असताना आता पुन्हा एकदा या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करून ही हत्या असल्याचा दावा केला आहे. त्यावर आता आदित्य ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
दिशा सालियनच्या वडिलांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. १४व्या माळ्यावरून पडल्यानंतरही तिच्या शरीरावर एकही जखम कशी नव्हती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली असून त्यात आदित्य ठाकरेंचं नाव असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात आज विधानसभेत सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.
विधानभवनाबाहेर माध्यम प्रतिनिधींनी आदित्य ठाकरेंना या सर्व प्रकरणाबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी पाच वर्षांपासून बदनामीचे प्रयत्न होत असल्याची टीका केली. “तुम्हीही या गोष्टीला साक्ष आहात. गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने बदनामीचे प्रयत्न होत आहेत. पाच वर्षं हे सतत चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल. मी एकच सांगेन, पाच वर्षं बदनामीचे प्रयत्न झाले आहेत. जे काही असेल ते उत्तर आम्ही कोर्टात देऊ. मी पाच वर्षांत मुद्द्याचं बोलत आलो आहे, मुद्द्याचंच बोलणार”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“महत्त्वाची बाब ही आहे की आम्ही या सरकारला या एका अधिवेशनात उघडं पाडलं आहे. फक्त आम्ही नाही, संघानंही उघडं पाडलं आहे. त्यांनीही सांगितलं आहे की औरंगजेब हा मुद्दा संयुक्तिक नाही. मग आता भाजपाचे नेते त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना उपस्थित केला आहे.
“यावर सभागृह बंद पाडायचं असेल तर पाडू देत”
दरम्यान, सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावरून सभागृह बंद पाडायचं असेल, तर पाडू देत, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. “आज आम्ही हाच प्रश्न विचारतोय की महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यातील १० मुद्द्यांपैकी एकाही आश्वासनाचा अर्थसंकल्पात समावेश केलेला नाही. औरंगजेबावर, हिंदुत्वावर आम्ही त्यांना उघडं पाडलं. एका मंत्र्याला राजीनामाही द्यावा लागला. हे सगळं झाल्यानंतर आज सभागृह कशावरून बंद पाडायचं तर माझ्यावरून बंद पाडायचंय. पाडू देत सभागृह बंद. पण जनता हाच प्रश्न विचारतेय की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात. तुम्हाला आम्ही काम करायला निवडून दिलंय. बोला ना महाराष्ट्राबद्दल. चर्चा करा”, असं ते म्हणाले.