शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते आक्रमक आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांना नेहमीच आव्हान दिलं जातं. कधी शिंदे गटाकडून वरळीत आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं जातं, तर कधी ठाकरे गटाकडून ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं जातं. अशातच आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत पत्रकारांनी आदित्य ठाकरेंनाच प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (२१ सप्टेंबर) सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
ठाण्यातून निवडणूक लढणार का या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी ठाण्यातून निवडणूक लढणार अशी लोकांमधून चर्चा पुढे येत असते. त्यावर काय होतं ते आगामी काळात बघू.”
“महाराष्ट्रात गद्दारांचं, गँगस्टरांचं सरकार”
“लोकशाही आहे की, हुकुमशाही सुरू आहे हा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात आपण पाहतोय की, गद्दारांचं, गँगस्टरांचं सरकार आहे. बिल्डर-काँट्रॅक्टरचं सरकार आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली.
“महिला आरक्षणाचं विधेयक ‘जुमला’ आहे”
महिला आरक्षणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “संसदेत मांडण्यात आलेलं महिला आरक्षणाचं विधेयक ‘जुमला’ आहे. आमचा महिला आरक्षणाला नक्की पाठिंबा आहे. मात्र हा जुमला तर नाही ना हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. जनगणना कधी होणार, मग पुनर्रचना कधी होणार? ही सर्व कार्यवाही झाल्यावर महिला आरक्षण मिळेल. त्यामुळे हा निवडणुकीपुरता एक जुमला आहे.”
हेही वाचा : “२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य, कारण…”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
“ज्या आमदाराच्या मुलाने अपहरण केलं आणि ते…”
“आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांना शिवीगाळ केली. ते अजूनही मंत्रिमंडळात आहेत. ज्या आमदाराच्या मुलाने अपहरण केलं आणि ते सीसीटीव्हीत पकडले गेले तेथे काहीही कारवाई झालेली नाही,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
“महाराष्ट्रात वारकऱ्यांवर, मराठा युवकांवर लाठीचार्ज होतो”
“एक गद्दार आमदार असे आहेत ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीच्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला होता. त्याचे ‘बुलेट शेल्स’ही मिळाले, तरीही अद्याप कारवाई झालेली नाही. याच महाराष्ट्रात वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो, मराठा युवकांवर लाठीचार्ज होतो, बारसूत महिलांवरही लाठीचार्ज झाला. हे असं घटनाबाह्य सरकार किती दिवस चालू शकतं,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला टोला लगावला.