शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत हजेरी लावली होती. देशातील लोकशाहीला धोका असल्याचं सांगत त्यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. यात्रेतील हजेरीवरून टीका करणाऱ्यांनादेखील ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“लोकशाहीसाठी दोन वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यात चुकीचे काय?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. “आम्ही सगळे लंबी रेस के घोडे आहोत. जोपर्यंत कारवा सुरू आहे तोपर्यंत आम्ही चालत राहू”, असा निर्धार आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. देशात खरं बोलणाऱ्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त आदित्य ठाकरे सहभागी, राहुल गांधींनी घेतली गळाभेट; पाहा खास फोटो
“बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. लोकशाही आणि संविधानासाठी त्यांनी हा पाठिंबा दिला होता. मात्र, आता देशात संविधान आणि लोकशाही चिरडली जात आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत”, असे त्यांनी म्हटले आहे. “जेजुरीच्या आराखड्याला स्थगिती दिली. गद्दारांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक चालवली त्यांनी हिंदुत्वाबाबत बोलू नये”, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
Bharat Jodo Yatra : “महाराष्ट्रातून जसे मोठे प्रकल्प गायब होताय, तसेच १५ लाखही गायब झाले”
दरम्यान, ‘भारत जोडो’ यात्रा हिंगोलीत दाखल होण्यापूर्वी नांदेडमधील नवा मोंढा येथे राहुल गांधींची सभा पार पडली. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली होती. “काळा पैसा आम्ही संपवू असा बहाणा बनवला आणि भारतीय रोजगाराचा कणा तोडला. नोटाबंदीनंतर काळापैसा गायब झाला का? उलट काळा पैसा वाढला”, असे गांधी नवा मोंढा येथील सभेत म्हणाले होते. “महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प गायब होत आहेत. त्याचप्रमाणे १५ लाखही गायब झाले”, अशी टीका राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती.