भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. “घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवणं हेच आमचं लक्ष्य आहे”, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. “घडयाळ बारामतीत बंद पाडलं पाहिजे, काँग्रेसचा पंजा साकुलीत थांबला पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी हाती घेतलेली मशाल अरबी समुद्राच्या पाण्याने विझवली पाहिजे” असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे आता स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. या टीकेवर वरळीचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांना बोलू द्या. यातून त्यांची वृत्ती समोर येत आहे. सूडबुद्धीनं काम सुरू असून द्वेषाचं राजकारण केलं जात आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये एकमेकांना संपवण्याची अशी भाषा कोणीही वापरली नव्हती. आतापर्यंत जे काही राजकारण झालं, त्याला पातळी होती. पण गेल्या पाच ते सहा वर्षांत रुपयाप्रमाणे ती पातळीही घसरत चालली आहे”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आगामी लोकसभेच्या निवडणुकीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी “मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ”, असं विधान केलं होतं. या विधानाचाही आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. “निवडणूक येईपर्यंत ते भाजपामध्ये राहतील का? असा उलट सवाल आदित्य ठाकरेंनी राणेंना केला आहे.
मनसे आणि भाजपाची युती? आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल, चर्चांना उधाण
राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडण्याबाबतच्या बावनकुळे यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणं, हे कुणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्हाला या जन्मात नव्हे तर पुढच्या सात जन्मातही घड्याळ बंद पाडणं शक्य नाही”, असं ठोंबरे यांनी म्हटलं आहे. हिटलरशाही आणि दबाब यंत्रणांचा आधार न घेता मैदानात या, राज्यातील जनता भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.