वेदांतचा महाराष्ट्रातील प्रकल्प स्थापन न करता गुजरातला जाणार असल्याच्या बातमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या वेदांत प्रकल्पाने आपला मोर्चा गुजरातला वळवला आहे. राज्यातील ‘खोके सरकार’वर विश्वास नसल्यानेच वेदांत प्रकल्प गुजरातला वळाला. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. तसेच पिस्तुल चालवणं, धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या, असं म्हणत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.
आदित्य ठाकरे म्हणाले, “वेदांतचा प्रकल्प आहे तो गुजरातला गेला आहे. वेदांत आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रकल्प येणं हे चांगलंच आहे, मात्र आम्ही या प्रकल्पसाठी एक वर्षात अनेक बैठका घेतल्या. अनेक भेटी देऊन पुण्याच्या जवळ हा प्रकल्प येईल अशी काळजी घेतली. त्यासाठी आम्ही काम करत होतो.”
“महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला गेल्याची बातमी वाचून धक्का बसला”
“मागच्या महिन्यात खोके सरकारदेखील आमच्याच कामावर पुढे गेलं आणि महाराष्ट्राला आश्वासन मिळालेला हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे असं वाटलं. मात्र, आज या प्रकल्पाची बातमी वाचून थोडा धक्का बसला. हा मोठा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे. कोणत्याही राज्यात गेले त्याचे दुःख नाही, मात्र हा प्रकल्प आपल्या राज्यात आला कसा नाही याचं आश्चर्य आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
“खोके सरकार हे राजकारणात व्यस्त”
ठाकरे पुढे म्हणाले, “या प्रकल्पावर महाविकास आघाडी सरकारने एवढं काम करून, एवढं सगळं पाठबळ देऊनही हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. आज आपण बघत आहात की खोके सरकार हे राजकारणात व्यस्त आहे. प्रशासनावर असेल, कायदा सुव्यवस्थेवर असेल कोणाचा अंकुश दिसत नाही. म्हणून या गोष्टी होत आहेत.”
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात, म्हणाले, “मागील काळात…”
“खोके सरकारने पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करणं सोडावं”
“खोके सरकारने पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करण खोके गुंड गर्दीची भाषा करणं सोडून द्यावं आणि मोठ्या इंडस्ट्रीजना आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा, हीच माझी विनंती आहे. जेणेकरून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल,” असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.