महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. एकनाथ शिंदे खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी अयोध्येला जाणार आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी म्हटलं, “हे कलयुग आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण, नक्कीच महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू. ‘रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाए पर वचन न जाई…’, हे आमचे ब्रीदवाक्य आहे. जनतेला दिलेले वचन पूर्ण करून दाखवू. तसेच, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ‘वज्रमूठ’ सगळीकडे सुरू आहे.”
हेही वाचा : अजित पवार आमदारांसह नॉटरिचेबल? शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले दिले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता, तेव्हापासून मी काम करतोय.”
“माझ्या दौऱ्यामुळे घरास बसणारेही सक्रिय”
अयोध्या दौऱ्यासाठी ठाण्यातून हजारो शिवसैनिक ठाणे रेल्वेस्थानकातून विशेष रेल्वेगाडीने निघाले. या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी एकनाथ शिंदे रेल्वे स्थानकात आले होते. त्यानंतर बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. “माझ्या दौऱ्यामुळे सर्व जण कामाला लागले आहेत. मी घरात बसणाऱ्यांना बाहेर काढले,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा : “राखी सावंतची तुलना फक्त अमृता फडणवीसांशी होऊ शकते, कारण…”, सुषमा अंधारेंचा टोला
“बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होते की, अयोध्येत प्रभू रामाचे भव्यदिव्य मंदिर व्हावे. आज ते स्वप्न साकार होत आहे,” असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.