प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणारा ट्रॅक्टर स्वत: चालवला आहे. यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. याला मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
शनिवारी मुख्यमंत्री शिंदे जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. यावेळी समुद्र किनारा स्वच्छ करणारा ट्रॅक्टर मुख्यमंत्र्यांनी स्वत: चालवला. तसेच, किनाऱ्याची पाहणी केली. यावर समुद्रात कुणी ट्रॅक्टर चालवतं का? अशी खिल्ली आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची उडवली आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“मी पाहिलेला फोटो हास्यास्पद आहे. समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता करणारे ट्रॅक्टर पाण्यात चालवून उपयोग आहे का? फोटोसाठी पोज तरी निट द्यायची. एवढ्या वर्षाची ओळख आहे, मला फोन करून विचारायचं होतं. आमच्या सहकाऱ्यांना पक्ष प्रवेशासाठी फोन करता, मग मला फोन करून मी समुद्र किनारा साफ करण्यासाठी काय केलं? हे विचारायचं होतं. ट्रॅक्टर घेऊन तुम्ही पाण्यात जाता. ही हास्यास्पद गोष्ट होत आहे,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
“कुठलाही मुख्यमंत्री नाल्यात उतरून पाहणी करत नव्हता”
याला प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले, “आदित्य ठाकरेंना काय वाटते, यापेक्षा मुंबई महापालिकेतील जनतेला काय वाटतं, याच्याशी आम्ही बांधील आहोत. ‘मुंबईच्या इतिहासात स्वच्छता करण्यासाठी मुख्यमंत्री आजपर्यंत कधीही रस्त्यावर उतरले नाहीत. कुठल्याही मुख्यमंत्र्यानं सिमेंटच्या रस्त्यांचा निर्णय घेतला नव्हता. कुठलाही मुख्यमंत्री नाल्यात उतरून पाहणी करत नव्हता,’ असं वक्तव्य एका जेष्ठ व्यक्तीनं केलं होतं,” अशी माहिती उदय सामंतांनी दिली.