Maharashtra Budget Session 2022 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं असून या अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाची सुरुवात देखील अपेक्षेप्रमाणेच वादळी ठरली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या भाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपावांना अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी घडलेल्या प्रकारावरून खंत व्यक्त केली आहे. “ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्रचा अपमान झाला आहे. राज्यपालांनी असं निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे सर्व अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले
राज्यपालांच्या भाषणावेळी नेमकं काय घडलं?
राज्यपालांच्या भाषणाने अधिवेशनाची सुरुवात होते. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषणासाठी विधिमंडळ सभागृहात येताच सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. ही घोषणाबाजी पाहाता राज्यपालांनी आपलं भाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपतं घेतलं.
काय म्हणाले होते राज्यपाल?
“महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे”, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात म्हणाले होते.