When Aaditya Thackeray Will get Married : राज्याचे युवा आमदार आदित्य ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली असून मनसेचे संदीप देशपांडेंविरोधात लढाई होणार असून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतु, या सर्व कोलाहलात आदित्य ठाकरेंना एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय, तो म्हणजे आदित्य ठाकरे लग्न कधी करणार? इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रश्नावर मिश्किल उत्तर दिलंय.

आदित्य ठाकरे यांना विविध प्रश्न विचारण्यात येत होते. त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी हा प्रश्न माझ्या घरातून नाही ना आला असा मिश्किल प्रतिप्रश्न केला. यावरून मुलाखतकाराने त्यांना विचारलं की, म्हणजे तुमच्यावर लग्नाचा दबाव आहे का? त्यावर ते म्हणाले की मी आता काही बोललो तर उगीच माझ्यावर कारवाई होईल. या प्रश्नोत्तरात आदित्य ठाकरे अन् मुलाखतकार यांच्यात चांगलीच खुमासदार जुगलबंदी रंगली होती.

हेही वाचा >> आदित्य ठाकरेंची एकूण मालमत्ता २३ कोटी, तर दाखल गुन्ह्यांमध्ये ‘त्या’ नोंदीचा समावेश; प्रतिज्ञापत्रात सविस्तर तपशील!

हा प्रश्न माझ्या घरातून कोणी पाठवला नाही ना?

आदित्य ठाकरे लग्न कधी करणार? असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येतो. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “हा सर्वांत कठीण प्रश्न आहे.” काहीजण म्हणतात की वडिलांना पुन्हा मुख्यमंत्री झालेलं पाहिल्यावरच आदित्य ठाकरे लग्न करणार आहेत का? असाही प्रश्न लोकांकडून विचारण्यात येतो. त्यावर ते म्हणाले, “असं अजिबात नाही. वडील म्हणतील की लग्न आधी कर, निवडणुका काय होत राहतील. पण हा प्रश्न माझ्याच घरातून कोणी पाठवला नाहीय ना?” असं म्हणताच प्रेक्षकांमधून खळखळाट झाला.

त्यावर मुलाखतकाराने विचारलं की, “म्हणजे तुमच्या घरातून लग्नासाठी दबाव आहे का?”, त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी आता काही बोललो तर पक्षाकडून माझ्यावर कारवाई होईल. आजच तिकिट मिळालं आहे.” कारवाई जास्तीत जास्त काय होईल असं विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “ते म्हणतील निवडणूक २०२९ मध्ये लढव, आता आधी लग्न कर.”

आदित्य ठाकरेंची मालमत्ता किती?

२०१९ साली पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांपूर्वी वैयक्तिक एकूण मालमत्ता १७ कोटी ६९ लाख रुपये होती. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण वैयक्तिक मालमत्ता २३ कोटी ४३ लाख इतकी आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता ६ कोटी ४ लाखांची आहे, तर जंगम मालमत्ता १७ कोटी ३९ लाख इतकी आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी गेल्या ५ वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीमध्ये ६ कोटींची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी विधि शाखेची पदवी घेतल्याचंही प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.