सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केली आहे. पण याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात मोर्चा काढला आहे. या मोर्चातून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे, याबाबत माहिती देताना आदित्य ठाकरेंनी एक किस्सा सांगितला आहे. भाजपा कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या ५५ लोकांनी मारहाण केली, मात्र संबंधित लोकांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा मुद्दा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. पण मुख्यमंत्री गप्प आहेत. राज्यात काय चाललंय? हे मुख्यमंत्र्यांना माहीतच नाही. मुख्यमंत्री दुसरीकडे बघतात आणि अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीत कौतुकाची थाप मारतात. दहिसरमध्ये एका कार्यकर्त्याने गद्दार गँगमधून सवयीप्रमाणे भाजपात पलटी मारली. ते आधी शिवसेनेत होते, मग गद्दार गँगमध्ये गेले. आधी कुठून आले होते, ते माहीत नाही. पण ते गद्दार गँगमधून भाजपात गेले. भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपामध्ये प्रवेश केला की सगळे सुरक्षित होतात, हेच आपल्याला आतापर्यंत माहीत होतं. घरी कुणीच येणार नाही. पोलीस, आयटी, ईडी, सीबीआय असं कुणीच घरी येणार नाही, असं त्यांचेच नेते बोलतात.”
हेही वाचा- “…तर उद्धव ठाकरेंना सोडणार नाही”, शेवटची चेतावणी देतोय म्हणत बावनकुळेंची धमकी
गद्दार गँगच्या ५५ लोकांनी भाजपा कार्यकर्त्याला धू धू धुतलं- आदित्य ठाकरे
“त्यामुळे दहिसरमधल्या या बिचाऱ्या कार्यकर्त्यालाही हेच वाटलं. आपण शंभर गुन्हे केली आहेत. एवढी पापं केली आहेत. त्यामुळे त्यानेही भाजपात प्रवेश केला. पण हा कार्यकर्ता भाजपात गेल्यानंतर गद्दार गँगच्या ५५ लोकांनी या माणसाला धू धू धुतला. स्वत: ला धुवायला हा वॉशिंग मशिनमध्ये (भाजपा) गेला. पण गद्दार गँगच्या लोकांनी त्याला धुवून काढला,” असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
हेही वाचा- “हिंमत असेल तर ४८ तासांत मातोश्रीवर या”, ‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं आव्हान
५५ लोकांवर अद्याप एफआयआर दाखल झाली नाही- आदित्य ठाकरे
“दुसऱ्या दिवशी सभागृहात या भाजपा कार्यकर्त्याचा आवाज भाजपाने नव्हे तर अनिल परब, अंबादास दानवे आणि जितेंद्र आव्हाडांनी उचलला. कारण तो कार्यकर्ता कुणाचाही असला तरी महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती एवढी घाणेरडी कधीही झाली नव्हती. राज्यात एवढं गलिच्छ राजकारण आपण कधीही बघितलं नव्हतं. राजकीय कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जातोय, म्हणून कधीही मारामाऱ्या झाल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे, भाजपात जाऊनही मारामारी झाली. भाजपाच्या कार्यकर्त्याने मार खाल्ला, तरीही ५५ लोकांवर अद्याप एफआयआर दाखल झाली नाही. महाशक्तीने त्यांना माफ केलं की काय?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.