एकीकडे राज्यात नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले असताना दुसरीकडे शिवसेनेनं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांदरम्यान जोरदार प्रचार सुरू केला आहे. आज शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर प्रदेशच्या काही भागात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातूनही शिवसेनेची चर्चा ऐकू येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी डुंबारियागंजमधील सभा संपल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना भाजपावर आणि देवेंद्र फडणवीसांवर खोचक शब्दांत निशाणा साधला.
शिवसेना उत्तर प्रदेशात खातं उघडणार?
आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये खातं उघडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. “डुंबरियागंजमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. इथल्या तरुणांमध्ये रोष आणि आक्रोष वाढतोय. इथे शिवसेना खातं उघडेल”, असं ते म्हणाले. याआधी संजय राऊतांनी प्रचारसभेत बोलताना यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचा पहिला मंत्री होईल, असं विधान करून नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडलं आहे.
“म्हणून याआधी उत्तर प्रदेशात लढलो नाही”
दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी बाबरी मशीद घटनेनंतर उत्तर प्रदेशात निवडणूक न लढवण्यामागचं कारण सांगितलं. “आम्ही तेव्हा मित्रपक्षाचा धर्म पाळला. त्यांची मतं कमी होऊ नयेत, म्हणून लढलो नाहीत. पण गोवा, उत्तर प्रदेश, मणिपूरमध्ये आम्ही लढणार आहोत”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
फडणवीसांच्या टीकेवर खोचक टोला!
बाबरी घटनेनंतर शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं, अशी खोचक टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. “जाऊ द्या. त्यांच्याबद्दल काय बोलायचं? त्यांना किती महत्त्व द्यायचं? महाराष्ट्रात ज्यांना महत्त्व नाही, त्यांच्या पक्षातही त्यांचं महत्व कमी होत चाललंय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
नवाब मलिकांच्या अटकेवर आदित्य ठाकरे म्हणतात..
“भाजपाकडून या गोष्टी सुरू झाल्या, म्हणजे कळतं की निवडणुका सुरू झाल्या आहेत. हे म्हणतात यांचा नंबर यईल, त्यांचा नंबर येईल. म्हणजे ती एजन्सी नक्की कोण चालवतंय. ती राजकीय हेतूने चालते हे स्पष्ट होतंय”, असं ते म्हणाले.