गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवर वाजणारे भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून मोठं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंगे बंद न झाल्यास त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवावी असं आवाहन राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यामध्ये केलं होतं. त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये देखील राज ठाकरेंनी या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज्य सरकारला सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यासंदर्भात राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना त्यावरून आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना नाव न घेता अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे. गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्प उड्डाण पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच”, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.

“दुसरा बाण काढायला लावू नका”

“भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना भोंग्याच्या आवाजाचा त्रास होतो. सण आणि उत्सवाच्या काळात आम्ही समजू शकतो. आम्ही गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक लावतो. पण तेही खरेतर चुकीचे आहे. परंतु मशिदीवरच्या भोंग्यातून ३६५ दिवस बांग सुरू असते. या भोंग्यांचा संपूर्ण देशाला त्रास होत आह़े अजान आणि नमाज घरात अदा करा, रस्ते आणि पदपथ कशासाठी अडवता, असा सवालही त्यांनी केला. हनुमान चालिसा लावणे हा केवळ भात्यातला एक बाण आहे. दुसरे बाण अजून आहेत आणि ते मला काढायला लावू नका”, असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.

Raj Thackeray Uttar Sabha : “कसलं हिंदुत्व? जो फक्त दंग्यांमध्ये हिंदू होतो तो…”, ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंची चौफेर टोलेबाजी!

राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी यावरून खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. भोंग्यांच्या राजकारणाविषयी विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी टोला लगावला आहे. “भोंग्यातून वाढलेल्या किमतींबद्दलही लोकांना सांगता आलं तर हेही सांगावं की पेट्रोल-डिझेलची, सीएनजीची दरवाढ कशामुळे झाली? आणि ६० वर्षांपूर्वी न जाता गेल्या २-३ वर्षांत काय झालं हे सांगावं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

विरोधकांचा फोकस वरळीहून कलानगरकडे?

कलानगरमध्ये पाणी तुंबू नये यासाठी काळजी घेतली जाते, असं विरोधकांकडून बोललं जात असल्याबद्दल पत्रकारांनी विचारताच आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा खोचक टोला लगावला. “विरोधकांनी फोकस वरळीहून कलानगरकडे केला आहे. किमान त्यांना काम दिसतंय ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी मुंबईतील इतर कामांकडे देखील बघावं. त्यांचं कामच हे झालंय की उठा आणि टीका करा. ठीक आहे, त्यांचं ते काम आहे. पण मुंबईकरांना पक्का विश्वास आहे की कामं होत आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray mocks raj thackeray on loudspeaker issue hanuman chalisa pmw