Aaditya Thackeray on Deenanath Mangeshkar Hospital : पैशांअभावी उपचारास नकारदिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपाप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने प्राथमिक अहवालात येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाला असून अद्याप माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय समितीकडूनही अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, यावरून युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

“ज्या संस्थेने प्रसूतीसाठी एका महिलेकडून १०,००,००० रुपये मागितले होते, त्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चालवणाऱ्या ट्रस्ट आणि संस्थेविरोधात मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“गर्भवती महिलेचे नातेवाईक ही खंडणी देण्यास असमर्थ ठरल्याने तिचा मृत्यू झाला. पण प्रश्न असे आहेत की, (अनामत रक्कम मागितल्याचा) अंतर्गत समितीने आरोप फेटाळला तरी काल एका डॉक्टरने कबूल केले आणि पदाचा राजीनामा दिला. रुग्णाला न वाचवता स्वतःचा बचाव करण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी रचणाऱ्या रुग्णालयावर पुणेकर विश्वास कसा ठेवू शकतात?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी पुणेकरांना विचारला.

हे रुग्णालय कोण चालवतंय?

ते पुढे म्हणाले, “जर रुग्णालय खंडणीची (अनामत रक्कम) मागणी करत असेल, तर रुग्णालयाच्या कर आणि महापालिकेच्या देयकांचे काय? ते कोट्यवधींमध्ये आहे! हे रुग्णालय चालवणाऱ्या ट्रस्टी आणि एजन्सींचे दरवाजे या यंत्रणा ठोठावतील का? हे रुग्णालय कोण चालवत आहे आणि ते इतके प्रभावी का आहेत की मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतो?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.

सुप्रिया सुळेंचेही सवाल

‘सामान्य नागरिकांनी १० हजार ते २० हजारांचा मिळकतकर थकविला, तर महापालिका घरासमोर बँड वाजविते. मग कोट्यवधींचा मिळकतकर थकविणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वेगळा न्याय का?’ असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. ‘गर्भवतीला रुग्णालयात साडेपाच तास बसवून ठेवले आणि १० लाख रुपयांची मागणी केल्याचे चौकशी समितीच्या अहवालामधून समोर आले आहे. या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,’ अशीही मागणी सुळे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray on deenanath mangeshkar hospital chairman over tanisha bhise death case sgk