Disha Salian Death Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सध्या चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. यानंतर हे प्रकरणत पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनची आत्महत्या नाही तर हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. यानंतर आज दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली आहे.

सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वकील निलेश ओझा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग असल्याचा आरोप निलेश ओझा यांनी केला. तसेच दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे देखील आरोपी असल्याचा खळबळजनक आरोप वकील निलेश ओझा यांनी केला. या आरोपावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिशा सालियन प्रकरणाबाबत वकील निलेश ओझा यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत प्रश्न विचारला. यावर आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे म्हणाले की, “त्यांना काय आरोप करायचे ते करुद्या. त्यांना काय बोलायचं ते बोलूद्या. मी याआधीही म्हटलं होतं की त्यांना जे बोलायचं ते बोलूद्या.”

वकील निलेश ओझा यांनी काय आरोप केले?

“आम्ही आज मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्याकडे तक्रार दिली. आता आमच्याकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. आम्ही केलेली तक्रारच एफआयआर आहे. आता पुढची जबाबदारी पोलिसांची आहे. आता पोलीस आरोपींवर कधी कारवाई करतात हे पाहावं लागेल. आम्ही जी तक्रार दिली तिच एफआयआर आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, दिनो मोरया, सूरज पांचोली, तसेच त्यांचे सुरक्षा रक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रावर्ती हे सर्व लोक आमच्या तक्रारीनुसार आरोपी आहेत”, असं वकील निलेश ओझा यांनी म्हटलं.

“दिशा सालियन प्रकरणात जेव्हा आदित्य ठाकरे यांचं नाव आलं, तेव्हा परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अशी स्टोरी सांगितली की आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यामध्ये कोणताही राजकीय नेता त्या ठिकाणी आलेला नव्हता असं परमबीर सिंह यांनी सांगितलं होतं, म्हणजे परमबीर सिंह यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केल”, असा आरोप निलेश ओझा यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्सच्या व्यापारात सहभाग असल्याचा आरोप निलेश ओझा यांनी केला. तसेच दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे देखील आरोपी असल्याचा गंभीर आरोप वकील निलेश ओझा यांनी केला आहे.