Aaditya Thackeray On Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एका गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी १० लाखांची अनामत रक्कम मागितल्याचा आरोप दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेतील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे.

आता या घटनेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राज्य सरकार काही कारवाई कऱणार आहे की नाही? राज्य सरकार हे रुग्णालय ताब्यात घेणार का? असे सवाल विचारत आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुर्देवी घटना घडली. पण त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा. मला या घटनेत कोणतंही राजकारण आणायचं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसतील तर सर्वसामान्य माणसांनी काय करायचं?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

“पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपयांची मागणी केली होती. मग दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला राज्य सरकार काही जाब विचारणार आहे की नाही? जर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला किमान ५ फोन केले होते अशी माहिती सांगितली जाते. मग जर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून रुग्णालय प्रशासनाला फोन जाऊन देखील ते दखल घेत नसतील तर त्या रुग्णालय प्रशासनाची ही मस्ती, मुजोरी सरकार उतरवणार आहे की नाही?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला एवढी मस्ती का आहे? या रुग्णालयात ज्या काही गोष्टी आहेत, त्या सुधारण्यासाठी राज्य सरकार समोर येणार आहे की नाही? किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सरकार ताब्यात घेणार का? तसेच या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं महानगरपालिकेला किंवा आयकर विभागाला काही देणं आहे का? आता हे देखील तपासणं गरजेचं आहे”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर भाजपाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी एका क्लिनीकची तोडफोड केली. मग भाजपाच्या राज्यात भाजपाच्याच कार्यकर्त्यांना असुरक्षित असल्याचं वाटतंय का? भाजपाच्याच कार्यकर्त्यांना न्याय मिळताना दिसत नाही. पण तरीही अशा घटनांवर मुख्यमंत्री गप्प आहेत. ही महिला भाजपाच्या एका आमदारांच्या पीएची पत्नी होती. ती महिला उपचाराची मागणी करत होती. पण उपचार मिळाले नाहीत. यानंतर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येतं कीसंबंधित रुग्णांची हिस्ट्री आम्हाला माहिती होती, मग सर्व माहिती असतानाही रुग्णालयाने तात्काळ उपचार का नाही केला?, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.