शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र आणि आदित्य ठाकरे यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये छापलेल्या एका जाहिरातीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू करून दिली आहे. या जाहिरातीमध्ये तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबातील व्हिव्हियन रिचर्ड्स अशी उपमा देण्यात आली आहे. त्यावरून तेजस ठाकरे लवकरच महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय प्रवाहात एंट्री करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असताना याविषयी आदित्य ठाकरेंना देखील माध्यमांनी विचारणा केली. तेव्हा ते स्वत:च यामुळे बुचकळ्यात पडल्याचं त्यांनी सांगितलं.
काय आहे जाहिरातीमध्ये?
तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मिलिंद नार्वेकरांनी छापून आणलेल्या जाहिरातीमध्ये तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्ड्स यांची उपमा देण्यात आली आहे. “”ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स तेजस उद्धव ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, असं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची ही नांदी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला.
दरम्यान, यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरेंना विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाहिरातीमध्ये तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्ड्स यांची उपमा का दिली आहे? असा प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे हसत हसतच “कशासाठी ही उपमा दिली तेच मीही बघतोय’, असं म्हणाले. तसेच, मिलिंद नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंना देखील सुनील गावस्कर यांची उपमा दिल्याबाबत विचारणा केली असता “ते तुम्ही त्यांनाच विचारा”, असं म्हणून आदित्य ठाकरे हसत हसत निघून गेले.
“ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स तेजस ठाकरे” – जाहिरातीचा तर्क आणि वितर्क!
काय म्हणाले मिलिंद नार्वेकर?
दरम्यान, आपण तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्ड्स का म्हणालो, यासंदर्भात मिलिंद नार्वेकर यांनी एबीपीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “तेजस ठाकरे यांची सडेतोड आणि स्पष्ट वृत्ती आहे. त्यामुळे त्यांना विव्हियन रिजर्ड्सची उपमा दिली. या जाहिरातीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. युवा सेना अध्यक्ष पदाशीही काहीही संबंध नाही. मी कुटुंब म्हणून आणि तेजसच्या स्वभावाला धरून म्हटलेलं आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “आदित्य ठाकरे जसे सुनील गावस्करसारखे संयमाने वागतात, तसे तेजस ठाकरे कुटुंबात विव्हियन रिजर्ड्ससारखे आहेत”, असं देखील मिलिंद नार्वेकर म्हणाले आहेत.