‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. ही टीका होत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. दीड लाख कोटींची गुंतवणूक असणारा ‘वेदान्त फॉक्सकॉन’ प्रकल्प गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राबाहेर गेल्याचा दावा फडणवीसांनी केला. यासाठी जुन्या बातम्यांचा हवाला उपमुख्यमंत्र्यांनी दिला.

फडणवीसांच्या या दाव्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती दिल्याचा दावा केला. यासाठी पुरावे म्हणून त्यांनी ‘वेदान्त फॉक्सकॉन’सोबत सरकारने घेतलेल्या बैठकींची ‘टाइमलाइन’ वाचून दाखवली. तसेच फडणवीसांनी उल्लेख केलेला ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प आणि ‘वेदान्त फॉक्सकॉन’ प्रकल्प पूर्णत: वेगळे असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. फडणवीसांच्या दाव्यानुसार, ही कंपनी जर गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राबाहेर गेली असेल तर २७ ऑगस्ट २०२२ मध्ये फडणवीसांनी वेदान्तचे प्रमुख अनिल अग्रवाल यांची भेट कशासाठी घेतली होती? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.

हेही वाचा- तीन लाख कोटींचा ‘नाणार’ प्रकल्प महाराष्ट्रात होणार की नाही? केरळचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले “प्रकल्प पूर्णपणे…”

वेदान्त फॉक्सकॉन कंपनीने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्येच गुजरातला जायचं ठरलं होतं, तर ही कंपनी आमच्यासोबत किंवा शिंदे फडणवीस सरकारसोबत इतके दिवस टाइमपास करत होती का? बाहेर चहा-बिस्किट मिळत नाही. म्हणून ते मंत्रालयात येऊन तुमची भेट घेत होते का? माझ्या माहितीप्रमाणे, २७ ऑगस्ट २०२२ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वेदान्त’चे प्रमुख अनिल अग्रवाल यांची भेट घेतली. त्यानंतर ५ सप्टेंबरला पुन्हा एकदा औपचारिक आमंत्रण देण्यात आलं होतं. पण याला कंपनीकडून उत्तर आलं नाही. त्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचं उघड झालं.

पाहा व्हिडीओ –

हे जसं खोके सरकार आहे, तसंच खोटं सरकारही आहे. फडणवीस आणि अनिल अग्रवाल यांच्यात भेट झाल्याचे ट्वीटही शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आले होते. याबाबतचे पुरावेही आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सादर केले. हे सगळं आधीच ठरलं होतं, तर तुम्हाला आमचे आमदार पळवल्याप्रमाणे तो प्रकल्प पळवून आणायचा होता का? मग तो प्रकल्प घेऊन गुवाहाटीला तरी जायचं होतं. कदाचित तो प्रकल्प तुमच्यासोबत आला असता, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.

हेही वाचा- Vedanta Foxcon: फडणवीसांकडून महाराष्ट्राची दिशाभूल, केंद्राकडे बोट दाखवून अपयश झाकण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप