मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. न्यायाला मुद्दाम उशीर करणं म्हणजे अन्याय करणंच आहे. हा अन्याय फक्त आमच्यावर नाही, तर महाराष्ट्रावर आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीका केली. त्यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले, “मविआचं तत्कालीन सरकार कपटीपणाने पाडून, त्या जागी घटनाबाह्य सरकार आणून भाजपाने महाराष्ट्रावर अन्याय केला. आता सभापती राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात चेंडू असताना (ट्रिब्यूनलची जबाबदारी असल्याने) सभापती मुद्दाम विलंब करण्याचे डावपेच खेळून असंवैधानिक सरकारचं संरक्षण करत आहेत. ते आपल्या क्षमतेच्या आणि चौकटीच्या पलीकडे जात आहेत.”
हेही वाचा – “युतीत ताकद दाखवावी लागेल, तरच…”, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान
“जगातली सर्वात मोठी लोकशाही असा दावा करणाऱ्या भारतात घटनाबाह्य सरकारचं अशा प्रकारे संरक्षण केलं जात आहे. हे पाहणं संतापजनक आहे. सभापती लवकरच घाना येथे राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत. परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील, जिथे घटनाबाह्यल आणि असंवैधानिक सरकार आहे. ज्याला बेकायदेशीर मार्गांनी संरक्षणही दिलं जातंय. या साऱ्यामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी होत असून भारतात लोकशाहीच उरलेली नाहीये, असे संकेत दिले जात आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरे पोस्टमध्ये पुढे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने मे २०२३ मध्ये आदेश दिला होता. सभापती अजूनही जलद न्याय देतील, अशी आम्हाला आशा आहे. हे फक्त एका पक्षाबद्दल नाहीये, तर महाराष्ट्राबद्दल आहे. संसदीय लोकशाहीची तत्त्वं न पाळता आणि राज्यघटनेचं संरक्षण न करता निर्णय पूर्ण होण्याआधीच संसदीय परिषदेसाठी परदेश दौरा करणं हे अयोग्य ठरेल. मुद्दाम वेळकाढूपणा करणं म्हणजे घटनेच्या विरोधात असलेल्यांना सभापतींचं संरक्षण असणं आहे. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र पाहत आहे. भारत पाहत आहे. जग पाहत आहे!”