शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रिया चक्रवर्तीला ‘एयू’ नावाने ४४ वेळा फोन कॉल आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा आरोप राहुल शेवाळेंनी केला आहे. लोकसभेत प्रश्न उपस्थित करत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. राहुल शेवाळेंच्या आरोपाला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. यावरून लक्ष हटवण्यासाठी राहुल शेवाळे यांनी आपल्यावर आरोप केले आहेत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रिया चक्रवर्तीला फोन करण्याच्या आरोपांबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मला त्या घाणीत अजिबात जायचं नाही. ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वत:च्या घरात नसते. त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. त्यांच्याकडून आम्हाला चांगलं काहीही अपेक्षित नाही. हे ४० गद्दार आमदार आणि ते १२ गद्दार खासदार यांना आता सगळेच अडचणीत आणत आहे. त्यांचे नवीन मित्रपक्षही त्यांना अडचणीत आणत आहेत. आमच्याकडूनही काल एनआयटी घोटाळ्याचा महत्त्वाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. हा घोटाळा मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणारा आहे. विधानसभेत राज्यपाल, एनआयटी यासारख्या विषयांवर आम्हाला बोलू दिलं जात नाही. आमचे माईक बंद केले जात आहेत.”
“महाराष्ट्राचे विषय बाजुला जावेत, म्हणून असे घाणेरडे विषय काढून बदनामी केली जात आहे. यामध्ये मला जायचे नाही. मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राद्वेषी राज्यपालांना वाचवण्यासाठी असे घाणेरडे विषय बाहेर काढले जात आहेत. मी राहुल शेवाळेंना काडीमात्र किंमत देत नाही. त्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं, हे मला माहीत आहे. मला काही लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही. कारण माझे तसे संस्कार नाहीत. म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.