गेल्या दोन आठवड्यांमध्ये राज्यभर झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर सरकारला घेरलं जात असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर जात असून तिथे अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
“सरकार कितीही घटनाबाह्य असलं, तरी…”
“मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस पडला. त्याआधीपासून आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहोत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणं गरजेचं आहे. आज मी, अंबादास दानवे, सचिन अहिर आम्ही सगळे शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. सरकार कितीही घटनाबाह्य असलं, तरी सरकारी यंत्रणेकडून मदत लगेच झाली पाहिजे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“आम्ही जरी विरोधी पक्षात असलो..”
गेल्या १० वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी अगदी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमुक्ती देणारं आमचं कदाचित पहिलंच सरकार होतं. जरी विरोधी पक्षात असलो, तरी राजकीय समाज म्हणून आमचं कर्तव्य आहे की आम्ही शेतकऱ्यांसोबत जाऊन उभं राहावं”, असं ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी सरकार निर्दयी झाल्याची टीका केली. “सत्ताधाऱ्यांकडून आत्ता तरी शेतकऱ्यांच्या भेटी घेण्याची अपेक्षा नाही. कारण हे सरकार निर्दयी झालं आहे. शेतकऱ्यांसोबत उभं राहाणं गरजेचं आहे. त्यांना जाऊन धीर देणं एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.