राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध ठिकाणी निषेध करणारी आंदोलनं केली जात आहेत, तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ‘खोके सरकार’ या टीकेवरून आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांना नोटीस पाठवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.
नेमकं घडलं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत पार पडलेल्या पक्षाच्या मंथन शिबिरात शिंदे सरकारवर ‘खोके घेतल्याचा आरोप’ असल्याचं म्हटलं होतं. तसेच, ‘अजूनही कुणी खोके घेतले नसल्याचा दावा केला नाही’, असंही त्या म्हणाल्या होत्या. आरोप चुकीचा असेल, तर नोटीस का पाठवली नाही, असा सवाल विरोधकांकडून शिंदे गटाला केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा आक्षेपार्ह पद्धतीने उल्लेख केल्यानंतर विरोध वाढू लागला आहे. त्यात आता विजय शिवतारेंच्या इशाऱ्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यावरून शिंदे गटावर तोंडसुख घेतलं आहे.
“कृषीमंत्री कुठे गायब आहेत?”
“बांधावर जाऊन आम्ही पाहणी करत आहोत. दोनदा अतीवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पण सरकार म्हणून कुणी पुढे आलेलं नाही. कृषीमंत्रीही गायब आहेत.उद्योगमंत्री काय करतायत, हेही कुणाला माहिती नाही. कारण महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. उद्योग आणि कृषी ह दोन महत्त्वाचे घटक कोलमडताना दिसत आहेत”, असं आदित्य ठाकरे माध्यमांना म्हणाले. सोलापुरात काही भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
“हा तर दिल्लीनं राज्याच्या माथी मारलेला महादळभद्री…”, ठाकरे गटाची एकनाथ शिंदे सरकारवर आगपाखड!
“खोक्यांचा इतर काही अर्थ आहे का?”
दरम्यान, खोके म्हटल्यावर शिंदे गटाला एवढं का झोंबतं? असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. “खोके म्हणजे नक्की काय? त्यांना हे का झोंबतंय? हेही त्यांनी स्पष्ट करावं. खोके म्हणजे खोके असतात. त्याचा इतर काही अर्थ असेल, तर त्यांनी सांगावं हे आम्हाला.
“३३ कोटी देशांनाही नोटीस पाठवा”
“महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला, यांच्या गद्दारीची नोंद घेणाऱ्या ३३ देशांनाही याची नोटीस पाठवली पाहिजे. कारण खोके सरकार जगभर प्रसिद्ध झालं आहे. नोटीस द्यायच्या आधी त्यांनी एकच सांगावं, की त्यांना हे का झोंबलं आहे. मग त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना सगळं बोलू द्या. पण या गद्दार सरकारमध्ये प्रत्येकजण फक्त राजकारणावर लक्ष देत आहे. राज्यातून उद्योग निघून गेले, याकडे कुणाचंही लक्ष नाहीये. महाराष्ट्र एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी मागे चालला आहे. गद्दार त्यांचं घाणेरडं राजकारण करत आहेत. त्यांना त्यांचं राजकारण करू द्या, आम्ही जनतेची सेवा करत राहू”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.