Aaditya Thackeray Slam BJP Amit Shah over Dr Babasaheb Ambedkar statement controversy : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली असून अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. यादरम्यान राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले. नागपूर येथील संविधान चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तीनही पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित शाह यांच्या विधानामुळे देशाचा आणि संविधानाचा अपमान झाल्याचा दावा करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “देशाची जनता रस्त्यावर उतरली आहे कारण हा अपमान फक्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला नाही तर देशाच्या जनतेचा, संविधानाचा देखील अपमान झाला आहे. आज आठवले, चंद्रबाबू, नितीश कुमार भाजपाबरोबर राहणार आहेत का? हे उत्तर त्यांनी द्यावं. आज अनेक आमदार असे आहेत जे स्वतःला आंबेडकरवादी मानतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देव मानतात जे आज भाजपाबरोबर आहेत. ते राजीनामा देणार आहेत का?”

१२ सेंकद त्यांच्या भाषणात होते की नव्हते? – आदित्य ठाकरे

डॉ. आंबेडकरांच्या मूल्यांचे पालन करणाऱ्या राजकीय पक्षाचा मी सदस्य आहे. आम्ही कधीही आंबेडकरांचा अपमान केलेला नाही. उलट, काँग्रेस आंबेडकरविरोधी असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले होते. तसेच काँग्रेसने माझ्या राज्यसभेतील विधानांची तोडमोड केली असून चुकीचा अर्थ काढला आहे. मोदींची भाषणेही संपादित करून काँग्रेसने प्रसारित केली आहेत. प्रसारमाध्यमांनी माझी पूर्ण विधाने दाखवावीत, असे आवाहन शाहांनी केले होता. याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “विपर्यास केला जातोय, अर्थ काढला जातोय, क्लीप काढली जातोय… ते १२ सेंकद त्यांच्या भाषणात होते की नव्हते? स्वत: बोलले होते, मग विपर्यास कसला केला जातोय? फॅशन झालंय असं कोण बोललं होतं?”.

हेही वाचा>> “राम शिंदे सर, क्लास कसा चालवायचा हे…”, विधानपरिषद सभापतीपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांची टिप्पणी, सभागृहात हशा!

तर माफी मागितली असती…

“ही भाजपाची भूमिका, मानसिकता आहे. त्यांच्या मनात हे नसतं आणि चुकून बोलले असते तर माफी मागून मोकळे झाले असते. देशात चूक कोणीही करू शकतो. चुका अनेक लोक करतात पण नंतर विनम्रता दाखवून माफी मागतात. इथे भाजपाची मानसिकता तशी आहे म्हणून त्यांनी माफी मागितली नाही. भाजपाच्या हे मनात आहे. लोकसभेवेळी आम्ही सांगत होतो की, यांचा संविधानावर राग आहे हे काल त्यांच्या भाषणात दिसून आले”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते अमित शाह?

संविधानावर सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होत राज्यसभेत बोलताना अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत विधान केले होते. “हल्ली फॅशनच झाली आहे. “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल”, असे अमित शाह म्हणाले होते. अमित शाह यांच्या विधानाचा सध्या देशभरातून टीका केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray slam bjp amit shah over dr babasaheb ambedkar statement controversy row marathi news rak