Aaditya Thackeray Maharashtra-Karnataka Border Dispute : बेळगाव येथे मराठी भाषकांचा महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्यास कर्नाटक सरकारने विरोध केल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा संघर्ष पेटला आहे. यादरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनातदेखील या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या सर्व आमदारांनी आज (सोमवार) कामकाजावर बहिष्कार टाकला. यादरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी दोन्ही राज्यांमधील सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याबरोबरच त्यांनी बेळगावच्या जनतेवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.
अत्याचार का सहन करतोय?
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या नेत्यांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देण्यात आली होती. या घोषणेचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी बेळगावच्या मुद्द्यावर भाजपाला धारेवर धरले आहे. आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र आणि बेळगावमधील मराठी जनता पाहत आहे. तेथील स्थानिक मराठी लोक तर हिंदूच आहेत, जेव्हा येथे येऊन आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ असं सांगतात, ते अशा वेळी जातात कुठे? ती जनता देखील मराठी म्हणजेच हिंदूच आहे. मग त्यांच्यावरील इतका अत्याचार आपण का सहन करतोय? यावर भाजपाने उत्तर देणे गरजेचे आहे”, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा>> “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील…
महाराष्ट्र कर्नाटक यांच्यातील सीमावदात केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांना बेळगाव येथे झालेल्या अटकेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “पदाधिकार्यांना नोटीसा दिल्या आहेत, अटक झाली आहे. स्थानिक जनतेवर लाठीचार्जदेखील होऊ शकतो. हे कुठेही न चिघळता केंद्र शासनाने आता हस्तक्षेप करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रशासित राज्य जाहीर करावं”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “संसदेचं अधिवेशन सुरू आहे. जोपर्यंत प्रकरणाचा निकाल नाही लागत तोपर्यंत बेळगावला केंद्र शासित प्रदेश बनवा. कारण हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे. स्वत: जाऊन वातावरण आणखी चिघळवण्यात काही अर्थ नाही. तिथं जाऊन तुम्ही नक्की करणार काय? खोटी आश्वासनं गेल्या वर्षीही पाहीली या वर्षीही पाहातोय” ,असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंची सोशल मिडियावर पोस्ट पोस्ट
आदित्य ठाकरेंनी या प्रकरणी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. “बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या ह्या अन्यायाचा तीव्र निषेध!”, असे ठाकरे म्हणाले आहेत.
“बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच! माझं कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा! महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही! आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे की हा सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा”, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.