Aaditya Thackeray on Maharashtra Election 2024: काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं होतं. ‘भाजपा आता स्वयंपूर्ण झाला असून आता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता नाही’ अशा आशयाचं विधान जे. पी. नड्डा यांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर भाजपा व आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सारंकाही आलबेल असल्याचं सांगितलं. आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे वरळीतील विधानसभा निवडणूक उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आरएसएस व भाजपाला लक्ष्य केलं आहे. तसेच, भारतीय जनता पक्षाला विद्यमान सरकारमध्ये मिळालेल्या वाट्याबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“महाराष्ट्रावर दोन वर्षांत अन्याय”

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भूमिका लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंनी यावेळी मांडली. “महाराष्ट्रातली परिस्थिती हरियाणा व जम्मू-काश्मीरपेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्रात मविआचा विजय होणार आहे. कारण इथे समस्या वेगळ्या आहेत. मोदी सरकारकडून, महायुती सरकारकडून महाराष्ट्रावर गेल्या दोन वर्षांत सातत्याने अन्याय झाला आहे. महाराष्ट्र या गोष्टींचा विचार करून मतदान करेल”, असं ते म्हणाले.

आरएसएस विरुद्ध भाजपा

भारतीय जनता पक्ष व आरएसएसमध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. “जर नड्डा म्हणत असतील की त्यांना आरएसएसची आता गरज नाही, तर मग मला आरएसएसला प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दोन वर्षांत त्यांना काय मिळालंय? त्यांनी याचा विचार केलाय असं मला वाटत नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“भाजपाबद्दल बोलायचं झालं तर मग गोपाळ शेट्टी, पूनम महाजन यांना तिकीट का मिळालं नाही? पंकजा मुंडेंना विधानपरिषदेच्या मार्गाने विधानभवनात का यावं लागलं? राज पुरोहित, प्रकाश मेहता हे राजकीय पटलावरून अदृश्य का झाले आहेत? विनोद तावडेंना महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याऐवजी दिल्लीत का बसावं लागतंय?” असे प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.

भाजपातील आयारामांचा मुद्दा…

दरम्यान, आरएसएस व भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी भाजपात आयात झालेल्या उमेदवारांना मिळालेली महत्त्वाची पदं यावेळी अधोरेखित केली. “भाजपाचे महाराष्ट्रातले टॉप ५ चेहरे कोण आहेत? २०१९ ला ज्यांच्यावर भाजपाकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत होते, ते आता भाजपाचे अग्रणी चेहरे म्हणून दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांत तुम्ही पाहिलं तर विधानसभेचे अध्यक्ष २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले होते, त्याआधी ते शिवसेनेत होते. ते मूळ भाजपाचे नाहीत. अवैध मुख्यमंत्री शिवसेनेकडून घेतले आहेत. त्यांचे १० मंत्री शिवसेनेकडून घेतले आहेत. अजित पवारांविरोधात पुण्यात गेल्या १० किंवा १५ वर्षांपासून भाजपा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढा देत आहे. पण अजित पवार महायुतीत सामील होताच पुण्याचे भाजपाचे पालकमंत्री हटवण्यात आले आणि अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री केलं. मग भाजपाचे कार्यकर्ते कुणासाठी लढले, कुणासाठी तुरुंगात गेले?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

Ladki Bahin Yojana: “निवडणुकीनंतर २१०० रुपये का? आधीच का नाही दिले?” आदित्य ठाकरेंचा सत्ताधारी महायुतीला सवाल!

“अगदी भाजपाला मिळालेल्या १० मंत्र्यांपैकी ६ मंत्री मूळ भाजपाचे असून ४ इतर पक्षातले आहेत. मग भाजपा आणि आरएसएसला काय मिळालं? सर्व मंदिर ट्रस्ट, महामंडळं एकनाथ शिंदेंना मिळाली. फक्त देवेंद्र फडणवीसांना त्यांना हवी ती खाती मिळाली. भाजपा कार्यकर्त्यांना काय मिळालं?” असा प्रश्न करत आदित्य ठाकरेंनी भाजपा नेतृत्वाला लक्ष्य केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray slams bjp rss amid maharashtra election 2024 pmw