२०१९ साली महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी काय घडलं? यावर अजूनही राजकीय वर्तुळात चर्चा, दावे, आरोप होतच असल्याचं पाहायला मिळत आहे. एका कार्यक्रमात २०१९ सालच्या घडामोडींसंदर्भात शरद पवारांनी केलेल्या विधानावर नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. एकीकडे २०१९चा मुद्दा अजून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील काही रुग्णालयांमध्ये रुग्णमृत्यूचं वाढतं प्रमाण चिंतेचा विषय बनू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.
“८०० कोटी पडून”
आरोग्य सेवेसाठीचे ८०० कोटी पडून असल्याचा दावा यावेळी आदित्य ठाकरेंनी केला. “काल पालकमंत्र्यांची घोषणा झाली. रायगडबाबत माहिती नाही. पुण्यात भाजपाच्या स्वत:च्या मंत्र्यांना हटवून बाहेरून आलेल्या व्यक्तीला पालकमंत्री केलं. ही प्रशासकीय बाब आहे. ठीक आहे. पण जे जीव नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमध्ये रुग्णालयांत गेले, त्यावर कुणी बोलायला तयार नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“धरण खेकडे फोडतात असं वाटणाऱ्या मंत्र्यांना हाफकिन दलाल आहे असं वाटलं. त्यामुळए ते सगळं बाजूला ठेवून त्यांनी एक नवीन समिती तयार केली. मी पेपरमध्ये वाचलं की ७००-८०० कोटी असेच पडून आहेत. सगळ्या सरकारी दवाखान्यांमध्ये डीनवर दबाव आहे की औषधं, व्यवस्थापनाबाबत त्यांनी त्यांचं बघावं.या विषयांकडे कोण लक्ष देणार?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत, आदित्य ठाकरेंचा टोला
दरम्यान, राज्यात रुग्णालयांतील रूग्ण मृत्यू प्रकरण तापलेलं असताना मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी टोला लगावला. “मी मुख्यमंत्र्यांना एका कार्यक्रमात आव्हान दिलं होतं की चला समोरासमोर बसून वेदांता फॉक्सकॉन, रुग्णालय रुग्ण मृत्यू प्रकरणावर चर्चा करू. पण ते टीव्हीवर बघितलं आणि ते स्वत:च दिल्लीला पळाले आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
अजित पवार ५ वर्षं मुख्यमंत्री? फडणवीसांना सवाल
दरम्यान, अजित पवारांना पाच वर्षं पूर्ण काळासाठी मुख्यमंत्री करू, असं देवेंद्र फडणवीस एका वाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाले. त्यावरून आदित्य ठाकरेंनी सवाल उपस्थित केला आहे. “अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तर करा. सगळं करा. पण जे मूळ भाजपाचे कार्यकर्ते आहेत, गेल्या २५ वर्षांपासून जे याच लोकांच्या विरोधात लढले, त्यांना बाजूला करून आता या लोकांना तुम्ही वॉशिंग मशिनमधून स्वच्छ करून घेत आहेत. अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांच्या भाजपामधली जुन्या लोकांना तुम्ही काय उत्तर देणार?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.