राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर साखर कारखान्यात गैरव्यवहाराचा आरोप केल्यानंतर त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच, अब्दुल सत्तारांचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केलं आहे.
“राहुल कुल प्रकरणावर सरकारनं स्पष्टीकरण द्यावं”
“संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर केलेल्या आरोपांवर त्यांनी बोलावं. ते जे करतात, ते जनसामान्यांसाठी असतं आणि आम्ही करतो ते राजकीय असतं का?. समोर आलेल्या भ्रष्टाचारावर सरकारकडून स्पष्टीकरण गरजेचं आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांचा उल्लेख ‘अब्दुल गद्दार’ असा करत खोचत टोला लगावला. “अब्दुल गद्दार.. नाही सत्तार.. हे त्यांच्या भागात गद्दार म्हणूनच ओळखले जातात. ते जेव्हापासून मंत्री झालेत, तेव्हापासून अशा गोष्टी ते बोलत आहेत. ज्यामुळे प्रत्येकाला दु:ख झालंय. कृषीमंत्री हे त्यांचं पद आहे. पण शेतीवर ते कधी काही बोलत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काही बोलले नाहीत. महिला खासदाराला शिवीगाळ केल्यानंतरही त्यांची हकालपट्टी झालेली नाही. भाजपा अशा मंत्र्याला पाठिशी कसं टाकू शकतं? हा प्रश्न आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
“सर्व मंत्र्यांना कामाशी देणंघेणं नसून खुर्चीशी देणंघेणं आहे. म्हणून त्यांच्याकडून असं वर्तन होत आहे”, असंही ते म्हणाले.
“सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याच दोन-तीन सदस्य मंत्र्यांवर भ्रष्टाचार प्रकरणी त्यांनी कारवाई केली आहे. पण आज वेळ अशी आली आहे की गद्दारांना संरक्षण द्यावं लागतंय. आपण भाषणात बघतो की घोषणा दिल्या जातात भारत माता की जय. पण आपल्या पोलिसांवर गोळीबार झाल्यानंतरही आपले गृहमंत्री त्या आमदारांना पाठिशी घालतात हे धक्कादायक आहे. जर त्यांना असं वाटत असेल की गोळी दुसऱ्यानं चालवली आहे, तर स्वत:ची बंदूक हरवणं हाही गुन्हा आहे”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
“हा हिंदुत्वावर हल्ला नाही का?”
“गणपती बाप्पांच्या मिरवणुकीत त्यांनी बंदूक काढली आहे. हा हिंदुत्वावर हल्ला नाही झाला का? हे अतिरेकी हल्ले नाहीत का? यांना तसंच वागवलं पाहिजे” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.