करोना काळातील कथित खिचडी वितरण गैरव्यवहार प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना ईडीनं १७ जानेवारी रोजी अटक केली. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाण यांचा अभिमान वाटत असल्याचं नमूद केलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
करोना काळात वाटप करण्यासाठीच्या खिचडीचा दर्जा आणि त्याचं प्रमाण घटवून यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विधानसभेत केलेल्या भाषणादरम्यान या मुद्द्याचा उल्लेख करून ठाकरे गटाला लक्ष्य केलं होतं. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं होतं. या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला असून त्याअनुषंगाने अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असून त्यांना झालेली अटक आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी जवळच्या सहकाऱ्याला अटक
काय आहे आदित्य ठाकरेंची पोस्ट?
आदित्य ठाकरेंनी या पोस्टमध्ये सूरज चव्हाण यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. “निर्लज्ज हुकूमशाही आणि त्यांच्या यंत्रणेसमोर न झुकणाऱ्या अशा निष्ठावान व्यक्तीचा सहकारी असण्याचा मला अभिमान आहे. सूरज चव्हाण हे कायमच सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या राज्यघटनेसाठी उभे राहिले आहेत. सत्तेकडून आलेले प्रलोभनांचे प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावले. त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात आहे”, असं आदित्य ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“आम्ही लोकशाहीसाठी या काळ्या कालखंडाशी लढा देऊ आणि विजयी होऊ. आपल्या राज्यातील हुकूमशाही सत्तेच्या कृती जग पाहात आहे”, असंही त्यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटलं आहे.
राजन साळवींच्या घरी धाड
दरम्यान, एकीकडे सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या राजन साळवींच्या घरी आज सकाळीच भ्रष्टाचार विरोधी पथकानं धाड टाकली. या पथकामार्फत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.