कोकणातील नाणार प्रकल्पावरून रंगलेलं राजकारण आणि प्रकल्पाच्या समर्थनार्थ, विरोधात मांडण्यात आलेल्या भूमिका या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणातील कोणत्याही रिफायनरी प्रकल्पाविषयी मूलभूत भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरेंनी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना स्थानिक महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याशी बोलताना आदित्य ठाकरेंनी भूमिका मांडताना कोणताही रिफायनरी प्रकल्प कोकणात यायचा झाल्यास त्यासाठी तीन आवश्यक गोष्टींचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी भूमिपुत्रांचा मुद्दा देखील ठामपणे मांडला.
कोकण दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकारची भूमिका मांडली. “चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. यासंदर्भात त्यांनी काही स्थानिक महिलांशी देखील संवाद साधला. या महिलांनी आग्रहाने रिफायनरी प्रकल्प व्हायला हवा, अशी मागणी आदित्य ठाकरेंकडे मांडली.
“प्रकल्पाच्या विरोधात काही मतं असली, तरी तुम्ही विरोधकांचा फार विचार न करता इथे प्रकल्प आणण्याबाबत निर्णय घ्या”, अशी विनंती या महिलांनी आदित्य ठाकरेंना केली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रकल्पाविषयी भूमिका स्पष्ट केली.
नाणार प्रकल्प होणार की नाही?; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले “चांगला मोठा प्रकल्प येत असेल…”
“तरच नवीन प्रकल्प इथे आणू”
“…रिफायनरीबद्दल दोन मतं आहेत. पाठिंबा आणि विरोध. कोणताही मोठा प्रकल्प येत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर इथे सगळ्यांशी चर्चा व्हायला हवी. स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घ्यायला हवं. दुसरी बाब म्हणजे प्रकल्पग्रस्तांना कसा न्याय मिळणार? त्यांना दुसरीकडे कसं हलवायचं हे पाहावं लागेल. तिसरं म्हणजे एखादा मोठा प्रकल्प येताना स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या कशा मिळतील, महिलांना नोकऱ्या कशा मिळतील. हे होत असेल तरच नवीन प्रकल्प आपण आणू”, असं आदित्य ठाकरेंनी यावेळी ठामपणे सांगितलं.
“मोठा प्रकल्प इथे आणायचाच आहे. जी कोणती कंपनी येत असेल, त्यांना भूमिपुत्रांशी चर्चा करू द्या. सत्य परिस्थिती आपल्याला सांगू द्या. त्यानंतरच आपण ते इथे आणू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “पण हे जरी झालं, तरी मुंबईत येणं थांबवू नका. मुंबई आपल्या हक्काची आहे”, असं देखील त्यांनी यावेळी नमूद करताच उपस्थितांनी त्याला दाद दिली.