आज मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडत आहे. या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “गेल्या नऊ-दहा महिन्यांत आपला महाराष्ट्र अंध:कारात गेला आहे. आपल्याला महाराष्ट्राला यातून बाहेर काढायचं आहे. महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे घेऊन जायचं आहे. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा उद्धव ठाकरे आपले कुटुंबप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. त्याच वेळी अजित पवार, बाळासाहेब थोरात असे नेते आम्ही सगळेच एक मजबूत टीम म्हणून काम करत होतो.”
हेही वाचा- राजकीय भूकंपाची तारीख जवळ आली? अजित पवारांच्या बंडखोरीबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
“कोविडच्या काळात अडीच वर्षे आपण महाराष्ट्राला सांभाळलं… जोपासलं… महाराष्ट्राचं अर्थचक्र जेव्हा बंद पडलं होतं, तेव्हा जून २०२० ते जून २०२२ पर्यंत आपण महाराष्ट्रात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणू शकलो. ही आपली महाविकास आघाडीची ताकद होती. त्या अडीच वर्षात राज्यात कुठेही दंगली झाल्या नाही, कुठेही भेदभाव झाला नाही. प्रत्येक आमदार त्याच्या विधानसभेतील शेतकरी, तरुण वर्ग, महिला यांची काळजी घेऊनच काम करत होता. आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घटनाबाह्य सरकार बसलं आहे. आज मी लिहून देतो की, हा थोड्या दिवसाचा खेळ आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच…”