शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर असून यादरम्यान शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांमध्ये टीकास्र सोडलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करतानाच त्यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा गद्दारी केल्याची टीका केली आहे. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोंडसुख घेतलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या सभेवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे गटावर तोंडसुख!
यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून बाहेर पडलेल्या ४० आमदारांवर तोंडसुख घेतलं. “तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होतं. असं गद्दारांसारखं मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्रानं तर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“अपचन झालं म्हणून हाजमोला खायला..”
“आपली चूक एवढीच झाली की आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिलं. त्यांना अपचन झालं आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावं लागलं. हे ४० लोक गद्दारीला बंड, क्रांती समजायला लागले आहेत आणि निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागले आहेत”, असा टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.
देवेंद्र फडणवीसांना दिला अप्रत्यक्ष सल्ला?
दरम्यान, शिंदे गटाच्या बंडखोरीवर तोंडसुख घेताना अशा लोकांसोबत सत्तेत बसण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडण्याचा अप्रत्यक्ष सल्ला यावेळी आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
“मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो, तर मी माझा स्वाभिमान सांभाळला असता. मी माझ्या पक्षाची प्रतिमा सांभाळली असती. या सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरा गेलो असतो. या ४० लोकांसोबत बसलो नसतो”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.