राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विशेषत: थेट मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांनाच जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राजकीय दृष्ट्या या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांकडून देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नेमका हा काय प्रकार आहे? राज्याच्या एका मंत्र्यांनाच धमकी कशी येते? त्यावर पोलीस दल काय करतंय? या मुद्द्यावरून आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार चर्चा झाली. आमदार सुनील प्रभू यांनी यावर चिंता व्यक्त केल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी त्याविषयी भूमिका मांडली. यावर अखेर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सविस्तर निवेदन दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसआयटीची स्थापना

या प्रकरणावरून आज विधानसभेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली. “ज्या भावना सदस्यांनी सभागृहात व्यक्त केल्या आहेत त्या आणि वेगवेगळ्या सदस्यांच्या तक्रारी लक्षात घेतल्या आहेत. विधानसभा सदस्य किंवा एखादा सामान्य नागरिक त्याच्याही आयुष्याची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. या विषयाचा अभ्यास करून राज्यस्तरावर एसआयटीची स्थापना करून त्या माध्यमातून आलेल्या धमक्या, घडलेली घटना आणि भविष्याकाळात त्यासाठी करायची उपाययोजना यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली.

कुणी, कुठून आणि कशी दिली धमकी?

या प्रकरणाचा घटनाक्रम यावेळी वळसे पाटील यांनी सांगितला. “सभागृहाचे सदस्य प्रभू यांनी विषय उपस्थित केला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी आली आहे. त्या धमकीच्या संदर्भात पोलीस विभागानं तपास केला आहे. धमकी देणाऱ्याचं नाव जयसिंग बजरंगसिंग रजपूत आहे. तो कर्नाटकमधील बेंगलोरचा रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. तिथे ताबडतोब पोलीस पथक रवाना करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नंतर अतिरिक्त मुख्य न्यायाधिकारी बेंगलोर यांच्यासमोर हजर करून ट्रान्झिट रिमांडद्वारे त्याला मुंबईत आणण्यात आलं. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे”, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

८ डिसेंबरला काय घडलं?

आरोपीने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्यात त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर त्याने तीन दूरध्वनी केले. ठाकरे यांनी ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा संदेश पाठवला. याप्रकरणी ठाकरे यांच्यावतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आदित्य ठाकरे यांना धमकी; बंगळूरु येथून एकाला अटक

भाजपाचा आक्षेप, आमदार समितीची मागणी

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी एसआयटीची स्थापना केल्याची घोषणा करताच विरोधी बाकांवरून त्याला विरोध करण्यात आला. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावर आमदारांच्या समितीची स्थापना करण्याची मागणी केली. “ही चर्चा पोलीस स्टेशनमध्येही उपस्थित करण्यात आली असती. सदस्याच्या जीविताला धोका असेल, तर ही आपल्यावर जबाबदारी आहे. एसआयटी किंवा पोलीस यावर लक्ष द्यायला तयार नाही. एकनाथ शिंदेंना धमकी आली. इथल्या अनेक सदस्यांना धमकी आली आहे. आमदारांची समिती तयार करा. ज्यांच्यावर तपासाची जबाबदारी आहे, ते २५ फोन केल्यावर एकदा फोन उचलतात. नेमकं काय सुरू आहे?”, असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मात्र, एसआयटीकडूनच या प्रकरणाची चौकशी होईल, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray threaten dilip walse patil maharashtra assembly winter session pmw