आज देशातल्या पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता सर्वच राज्यामध्ये भाजपा आघाडीवर आहे. महाराष्ट्र भाजपाही आता आक्रमक झालं असून १० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार पडणार असा इशारा चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आता पुन्हा केला आहे.
यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एक सल्लावजा इशाराही दिला आहे. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी आवरलं पाहिजे, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. भाजपाचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील भाजपाच्या चार राज्यांमधल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंनी आवरलं पाहिजे. कारण राऊत आज एका वर्तमानपत्रात काम करतायत, उद्या दुसरीकडे जातील. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भविष्य आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे”.
हेही वाचा – “मी दिलेल्या तारखांना बॉम्ब पडलेच, आता…”; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सूचक इशारा
काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी १० मार्चला महाविकास आघाडी सरकार पडणार असं विधान केलं होतं. त्याची त्यांनी आता पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. मी दिलेल्या तारखांना बॉम्ब पडला, १० तारखेला चार राज्यं जिंकली आता पाहू, ११ तारखेला काय होतं असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवे संकेत दिले आहेत.
तसंच, मी ज्या ज्या तारखांना बॉम्ब पडणार असं सांगितलं होतं, ते ते घडत गेलं आहे. आता ११ तारखेला काय होतं ते पाहूया, असं सूचक विधानही पाटील यांनी केलं आहे.