केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका करताना केलेल्या एका विधानावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालं. राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. याचदरम्यान २४ ऑगस्ट रोजी युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिवसैनिक चांगलेच आक्रमक दिसून आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वरूण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर आली होती. पण वरुण सरदेसाई आक्रमक झालेली ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही वरूण सरदेसाई चर्चेत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांच्या मागे काही राजकीय अर्थ आहे का अशा चर्चा सध्या रंगल्या जात आहेत. काय आहे या मागचं कारण… जाणून घेऊया.
वरुण सरदेसाई यांचे ठाकरे परिवारासोबत कौटुंबिक नाते आहे. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि रश्मी ठाकरे यांच्या सख्ख्या बहिणीचे चिरंजीव आहेत. ते युवासेनेचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. तसेच शिवसेनेचे आयटी सेल सांभाळण्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडेच आहे. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय
वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे भाऊ असण्यासोबतच त्यांचे अगदी विश्वासू सहकारी म्हणूनही ओळखले जातात. आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढावी यासाठी सर्वांत आधी त्यांनीच आग्रह केला होता. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न देखील केले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांच्या प्रवासात वरुण सरदेसाई यांचा मोठा वाटा आहे.
युवासेना नेते म्हणून महत्वाची कामगिरी
२०१७ मधील कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यानही त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याच बरोबर २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकी वेळी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी देखील त्यांनी प्रचार केला होता. मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांची भूमिका महत्वाची होती. यावेळी सर्व १० जागांवर जिंकून येऊन युवासेनेने विक्रम रचला होता.
आता वरुण सरदेसाई चर्चेत यायचं कारण काय?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांचे युवासेनेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचे अध्यक्षपद सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली असून शिवसेनेने देखील यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकांसाठी युवा कार्यकर्त्यांना तयार करण्यात येतंय. त्यातच वरुण सरदेसाई यांनी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे दौरे सुरु केले आहेत. आगामी निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी ते महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
वरुण सरदेसाई यांचा राजकारणातील वाढता सहभाग पाहता त्यांच्याकडे युवासेनेचे अध्यक्षपद जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतेय. असे झाल्यास शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पद ठाकरे कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे दिले जाईल. सुरुवातीला राज ठाकरे हे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर युवासेनेची स्थापना करण्यात आली. ११ वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते. आता आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांना युवासेनेकडे पूर्ण लक्ष देता येणार नाही. त्यामुळेच वरुण सरदेसाई आता युवासेनेचे नवे अध्यक्ष होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची यावर काय भूमिका असेल याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.