Aaditya Thackeray Heart Break : वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे लग्न कधी करणार? त्यांची लव्ह स्टोरी कशी असेल? कॉलेजजीवनात त्यांचे किती हार्टब्रेक झाले असतील? कॉलेजमध्ये असताना कोणत्या प्रेरणेने ते कविता लिहित असतील? असे असंख्य प्रश्न त्यांच्या चाहत्यांना आणि समर्थकांना पडत असतील. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या Screen या चॅनेलवरील मुलाखतीत ते बोलत होते.
जेव्हा तुम्ही राजकारणात सक्रिय नसता, तेव्हा थकवा घालवण्याकरता तुम्ही काय करता? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “सामान्य लोकांना भेटून किंवा तुमच्याकडून काही आशा असलेल्या लोकांना भेटून कोणताही थकवा जाणवत नाही. लोक मला विचारू शकतात आणि माझ्याकडून मदत घेऊ शकतात, यासाठी मी कृतज्ञ आहे. पण जेव्हा थकवा जाणवतो तेव्हा मी साधं कारच्या सनरुफमधून डोकं बाहेर काढतो आणि आजूबाजूच्या लोकांना पाहतो, एखाद्या सभेच्या व्यासपीठावर जातो तेव्हा थकवा दूर होतो. थोडक्यात लोकांमध्ये मिसळल्यावर, त्यांच्यात उभं राहिल्यावर मला ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा अनेक दिवस पुरते.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा मला दिवस शांततेत घालवायचा असतो तेव्हा मी वाचन करतो किंवा दोन तीन जवळच्या मित्रांना भेटतो. त्यांच्यासोबत ड्राईव्हला जातो.” यावर तुमच्याकडे विश्वासू मित्र आहेत का? असं विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “प्रत्येकालाच मित्र असायला हवेत. आपल्याला मित्रांवरच नाही तर सगळ्यांवरच विश्वास ठेवावा लागतो कारण हे कामच विश्वासाचं आहे. तुम्हाला लोकांच्या चांगुलपणावर विश्वास असणं गरजेचं आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी अनेकदा चित्रपट पाहायला जातो. कॉन्सर्टलासुद्धा जातो. मी नुकताच कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टला गेलो होतो. हरिहरन जी आणि पॅपॉन यांच्या एका मैफिलीतही गेलो होतो. मी आधी स्वतःला कवी म्हणायचो. आता माजी मंत्री, माजी क्रिकेटर, माजी कवी म्हणवतो. अगदी एक दशकाआधी मी अगदी साध्या, हळव्या कविता करायचो. त्या आता पाहिल्या तरी प्रश्न पडतो की हे का लिहायचो?”
कविता लिहिताना काही हार्टब्रेक झाला होता का?
कविता लिहिताना काही हार्टब्रेक झाला होता का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “हार्टब्रेक नाही. पण रोमँटिक आणि हळव्या कविता करायच्या असतील तर हार्टब्रेक अनुभवावा लागतो. त्यावरून अनेकदा माझा लहान भाऊही मला चिडवायचाही.”
आता शेवटचा हार्टब्रेक कधी झाला होता? असं विचारल्यावर आदित्य ठाकरे मिश्किलीत म्हणाले, “आता तर सगळ्यात अलीडकचा हार्टब्रेक २०१४ आणि २०१९ ला झाला होता.”