जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी बाह्य़रुग्ण विभागात हजर आहेत की नाही यासाठी आम आदमी पार्टीच्या अलिबाग युनिटने गेल्या १० दिवसांपासून मोहीम उघडली आहे. पण या मोहिमेमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही मोहीम तातडीने थांबवली नाही तर सर्व अधिकारी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्हा रुग्णालयात दररोज मोठय़ा प्रमाणात रुग्ण येत असतात. सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत बाह्य़ रुग्ण विभाग सुरू ठेवणे अपेक्षित असते. मात्र अनेक वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसतात, त्यामुळे रुग्णांची गरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने गेल्या १० दिवसांपासून एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. दररोज सकाळी ९ ते १०च्या दरम्यान आपचे कार्यकत्रे बाह्य़रुग्ण विभागात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची हजेरी तपासतात. त्यानंतर अनुपस्थित डॉक्टरांचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात लेखी स्वरूपात नोंदवतात. गरहजर डॉक्टरांच्या कक्षाचे छायाचित्रणही या वेळी केले जाते. डॉक्टरांनी बाह्य़रुग्ण विभागात वेळेवर हजर राहावे आणि रुग्णांना चांगल्या सुविधा द्याव्यात हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे दिलीप जोग यांनी या वेळी सांगितले.

मात्र आम आदमी पार्टीने सुरू केलेली ही मोहीम डॉक्टरांसाठी मनस्ताप ठरत असल्याचे आता समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयात वर्ग १ ची ८० टक्के पदे रिक्त आहेत तर वर्ग २ ची ५० टक्के पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीतही दररोज ४५० ते ५०० रुग्णांवर दररोज बाह्य़रुग्ण विभागात तपासले जात आहेत. जवळपास २०० रुग्णांना आंतररुग्ण विभागात उपचार केले जात आहे. अशा वेळी एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर दोन ते तीन जबाबदाऱ्या सोपविल्या जात आहेत. रुग्णांना चांगल्या सेवा देऊनही जर नियमांवर बोट ठेवून मानसिक दडपण आणण्याचे काम केले जात असेल तर वैद्यकीय अधिकारी ते सहन करणार नाहीत. आपच्या कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करा, अन्यथा आम्ही सामुदायिक राजीनामे देऊ असा पावित्रा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आधीच डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे अडचणीत सापडलेली जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमार ननावरे यांनी दिलीप जोग यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र तरीही दिलीप जोग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोहीम थांबवलेली नाही. जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दिलीप जोग व त्यांच्या सहकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.

‘कमी मनुष्यबळात रुग्णांना चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. पण ही परिस्थिती कायम राहिली तर आम्ही इथे काम करायचे की नाही याचा विचार करावा लागेल. मानसिक दबावाखाली काम करणे शक्य नाही,’ असे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण ननावरे यांनी सांगितले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party agitation in district hospital