हा देश घटनेवर चालत असून देशात कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती नसताना आमिर खानने केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. त्याने देश सोडून जाण्याची भाषा करू नये, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
रिपाइंला केंद्र आणि राज्यात एकेक मंत्रिपद मिळावे यासाठीचा आग्रह त्यांनी पुन्हा एकदा मांडला असून, ‘नाही मिळाला सत्तेत वाटा तर सरकारचा काढू काटा’ असा खास आठवले स्टाइल इशाराही त्यांनी दिला. संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर नांदगाव येथे आंबेडकरनगरातील कमानीचे उद्घाटन मंगळवारी आठवले यांच्या उपस्थितीत झाले. नांदगावला रवाना होण्यापूर्वी नाशिक येथे विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाचे काटेकोरपणे पालन प्रत्येकाने केल्यास कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यासाठी सरकारने स्वत: पुढाकार घेण्याची गरजही आठवले यांनी व्यक्त केली. केंद्रात मंत्रिपद मिळावे ही इच्छा व्यक्त करतानाच राज्यात परतण्याची आपली इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader