खासदार अजय संचेती यांनी कंपनी स्थापनेसंदर्भात गैरप्रकार करून कंत्राटे मिळविल्याचा आरोप करणारी तक्रार आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रभारी अंजली दमानिया यांनी सोमवारी अखेर नागपूर शहर पोलिसांकडे सादर केली. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसांची वेळ मागितली आहे.
अंजली दमानिया या कार्यकर्त्यांसह दुपारी पावणेतीन वाजता पोलीस आयुक्तालयात गेल्या. पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांनी सन्मानाने त्यांना पाच कार्यकर्ते व वकिलांसह कक्षात पाचारण केले. तेथे पोलीस आयुक्तांजवळ त्यांनी तक्रार केली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे यांची भेट घेऊन तक्रारीबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांच्यासोबत चर्चा करून या तक्रारीसंदर्भात खासदार अजय संचेती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आताच गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी त्यांनी दीड तास आयुक्तालयात ठाण मांडले होते. प्राथमिक चौकशी केल्यानंतरच गुन्हा दाखल करता येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करून मूळ कागदपत्रे मागविली जातील. त्याची पडताळणी, तसेच प्राथमिक चौकशी करण्यासाठी शुक्रवापर्यंत पोलिसांनी वेळ मागितला.
अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार अजय संचेती यांची शक्तीकुमार संचेती अँड कंपनी ही कंपनी होती. २८ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांनी एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर ही नवी कंपनी स्थापन केली. त्यानंतर जुनी कंपनी बंद होऊन नव्या कंपनीच्या नावे कारभार व्हायला हवा होता, मात्र तसे झाले नाही. दोन्ही कंपन्यांच्या नावे त्यांनी विदर्भ सिंचन महामंडळाकडून कंत्राटे मिळविली. याशिवाय एस. एन. ठक्कर कंपनीसोबत संयुक्त भागीदारीनेही कंत्राटे मिळविली. कुठल्याची एका कंपनीला तीनपेक्षा अधिक कंत्राटे दिली जाऊ नयेत, असा नियम आहे. मात्र संचेती यांनी विविध प्रकारे बारा कंत्राटे मिळविली. तीन ते चार हजार कोटी रुपयांची ही कंत्राटे आहेत.
अंजली दमानिया यांची अखेर खा. संचेतींविरुद्ध पोलिसांत तक्रार
खासदार अजय संचेती यांनी कंपनी स्थापनेसंदर्भात गैरप्रकार करून कंत्राटे मिळविल्याचा आरोप करणारी तक्रार आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रभारी अंजली दमानिया यांनी सोमवारी अखेर नागपूर शहर पोलिसांकडे सादर केली.
First published on: 18-02-2014 at 02:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap leader anjali damania files police case against sancheti in irrigation scam