दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पार्टीने भाजपाचा पराभव करत विजय मिळवला, तर दुसरीकडे गुजरातमध्ये भाजपाने काँग्रेससह नव्याने विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या आपचा दारूण पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना या विजयांसाठी अभिनंदन करताना आप आणि भाजपात दिल्ली व गुजरातबाबत साटेलोटे झाल्याची टीका केली. यावर शुक्रवारी (९ डिसेंबर) महाराष्ट्र आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली.
मुकुंद किर्दत म्हणाले, “चिवटपणे जगातील सर्वात मोठ्या, दमनकरी भाजपाशी राजकीय लढाई लढताना ‘कट्टर आणि ईमानदार’ असणे म्हणजे काय हे संजय राऊत यांना कसे कळणार? ज्यांना सतत ‘डील’ करायची सवय आहे त्यांच्या शंकांना हास्यास्पद म्हणूनच कानाडोळा करणे योग्य.”
दरम्यान, आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये मुकुंद किर्दत म्हणाले होते, “अरविंद केजरीवाल यांनी आधी काँग्रेसला सत्तेतून दूर केले, आता भाजपाला हरवले आहे. या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने ७ मुख्यमंत्री प्रचारात उतरवले होते. परंतु जनतेला द्वेषाचे राजकारण नको आहे, जनतेने शिक्षण, वीज, स्वच्छ्ता, आरोग्य यावर मतं दिली आहेत.”
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
संजय राऊत म्हणाले होते, “तीन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या. बुधवारी (७ डिसेंबर) दिल्ली महानगरपालिकेतील १५ वर्षांची सत्ता आपने खेचून घेतली. बसपा आणि एमआयएमकडून मतविभागणं झाली नसती, तर आपला चांगलं यश मिळालं असतं. तरीही देशाच्या राजधानी दिल्लीत आपला जे यश मिळालं ते कौतुकास्पद आहे. दिल्लीत १५ वर्षांची भाजपाकडून खेचून घेणं सोपं काम नाही.”
“…तर नक्कीच भाजपाला ‘काटे की टक्कर’ द्यावी लागली असती”
“दुसरा गुजरातचा निकाल अपेक्षित आहे. तिकडेही आप आणि काही अन्य पक्षांनी एकत्र येऊन काही आघाडी केली असती किंवा एकमेकांना समजून घेतलं असतं तर नक्कीच भाजपाला ‘काटे की टक्कर’ द्यावी लागली असती.मात्र, दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा असं काही तरी झालं असावं अशी लोकांना शंका आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा : “हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल आणि गुजरातमध्ये…”, संजय राऊत यांचं मोठं विधान
“तीन विरुद्ध एक असा हा सामना झाला”
“हिमाचलमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस चांगली लढत देत आहे. हे चित्र आशादायी आहे. तीन निवडणुकांमध्ये गुजरात भाजपाला मिळालं आहे, दिल्ली हातून गेलीय. हिमाचलला संघर्ष करावा लागतो आहे आणि काँग्रेस जिंकेल. म्हणजे तीन विरुद्ध एक असा हा सामना झाला आहे,” असं म्हणत राऊतांनी भाजपाला टोला लगावला होता.