बेकायदेशीररीत्या प्रवेश शुल्क आणि देणगी घेणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांविरोधात कारवाईसाठी येथील जिल्हा परिषदेसमोर आम आदमी पक्षाच्या (आप) वतीने आंदोलन करण्यात आले. बेकायदेशीररीत्या घेतलेले शुल्क परत करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करून अशा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शहरातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शासकीय नियमांची पायमल्ली करून मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर प्रवेश शुल्क आणि देणगी घेतली जात असल्याची ‘आप’ची तक्रार आहे. शिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत सर्वाना सूचना देण्यात आलेल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे या निवेदनाद्वारे लक्षात आणून देण्यात आले आहे. निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, १२ वीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे घेतलेले शुल्क परत करावे, प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसमोर प्रवेश शुल्कविषयक फलक लावावेत, माध्यमिक शाळा संहिता परिशिष्ट ७० प्रमाणे ११ वी तसेच १२ वीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे, मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या माहितीचा खुलासा मिळावा, यांचा समावेश आहे. मागण्या मान्य न केल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा पक्षाचे जिल्हा समन्वयक अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, जितेंद्र भावे, जिल्हा सचिव मुकुंद बेणी, स्वप्निल घिया, खजिनदार सुरेश शिंदे, जगबीर सिंग आदींनी दिला आहे.