आम जनतेच्या उद्वेगाचा धक्का मोदी सरकारला बसल्याचे दिल्लीतील निवडणूक निकालामुळे स्पष्ट झाले. एका मुंगीने हत्तीला हरविणे असे त्याचे वर्णन करावे लागेल, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी आम आदमी पार्टीचे कौतुक केले. मात्र, या पक्षात पुन्हा धोरणात्मक पातळीवर सक्रिय होणार का, या प्रश्नाच्या उत्तरात सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही, असे म्हणत त्यांनी याचे उत्तर टाळले. मात्र, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर आम आदमी पक्षाने काम करावे असे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. साखर कारखाने विक्रीविरोधात धोरण ठरविण्यासाठी एका विशेष बैठकीसाठी त्या औरंगाबाद येथे आल्या होत्या.
राज्यात ४० हून अधिक साखर कारखान्यांची विक्री झाली. या कारखान्यांच्या जमिनी संबंधित सहकारी संस्थांना परत देण्यात याव्यात. कारण जमिनीतील गैरव्यवहार हा सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे केंद्र असून विकलेल्या कारखान्याच्या जमिनी मूळ व्यक्तीला परत कराव्यात, अशी भूमिका असल्याचे पाटकर यांनी सांगितले. भूमी अधिग्रहण कायद्यातील नव्या अटींमुळे लोकशाहीचा श्वास कोंडला जाऊ शकेल. या संबंधातील अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात होऊ नये, म्हणून होणाऱ्या आंदोलनात अण्णा हजारे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. ते कदाचित सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे ८० हजार हेक्टर जमीन पडीक आहे. तरी देखील सुपीक जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया चालूच असल्याचे त्यांनी सांगितले. भांडवलदारांच्या हातात जमीन, पाणी आणि नैसर्गिक साधनसंपत्ती देणारा कायदा तयार केला जात असल्याने त्याला विरोध करण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीतील भाजपचा पराभव म्हणजे पंतप्रधान मोदी यांचा पराभव असल्याचे सांगत त्यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. देशभरातील रा. स्व. संघाचे कार्यकर्ते, माध्यमांची ताकद प्रचारात उतरवली होती. तरी देखील त्यांचा पराभव झाला, म्हणूनच आम आदमी पक्षाच्या विजयाचे वर्णन मुंगीने हत्तीला हरविल्यासारखेच करावे लागेल, असेही पाटकर म्हणाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा