दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पडले, तर देशात चुकीचा संदेश जाईल. कॉंग्रेसने ‘आप’चे सरकार पाडले, तर जनताच कॉंग्रेसची सरकारे पाडेल, त्यामुळे कॉंग्रेस ‘आम आदमी’चे सरकार पडू देणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी व्यक्त केला. राळेगणसिद्धीमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना हजारे यांनी केजरीवाल यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असे सांगितले.
कॉंग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे. गेल्या आठवड्यातत पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आम आदमी पक्षाच्या सरकारला गुरुवारी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे आहे. आम आदमी पक्षाचे २८ सदस्य आणि कॉंग्रेसचे ८ सदस्य यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केल्यासच दिल्लीतील सरकार तरणार आहे.