जलसंपदातील गैरव्यवहार उजेडात आणणारे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त मुख्य अभियंता व त्यानंतर आम आदमी पक्षात प्रवेश केलले विजय पांढरे यांनी आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेल्या घवघवीत यशावर आनंद व्यक्त करत भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे म्हटले आहे.
विजय पांढरे म्हणाले, “मतदारांना बदल आणि भ्रष्ट नेत्यांना सत्तेवरून खाली उतरवायचे आहे. दिल्लीतील निकालांनुसार आम आदमीला मिळालेले यश हे भ्रष्टाचार मुक्त समाजाच्या दिशेचे पहिले पाऊल आहे.” यापुढेही पक्षाला भारतीय जनतेचा मोठा पाठिंबा मिळेल यात कोणतीच शंका नसल्याचेही पांढरे म्हणाले.
१ डिसेंबर रोजी आम आदमी पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश संयोजक अंजली दमानिया यांनी पांढरे यांचे टोपी घालून व स्वराज हे पुस्तक देऊन पक्षात स्वागत केले होते. यावेळी एखाद्या मुरब्बी राजकारण्याप्रमाणे पांढरे यांनी प्रश्नांची उत्तरे देत राजकीय टोलेबाजी केली होती.
आपण काही मिळवायचे म्हणून राजकारणात प्रवेश केलेला नाही. तर, देशाच्या राजकीय क्षेत्राची झालेली वाताहत लक्षात घेऊन सज्जन लोकांचे संघटन करण्याचा हेतू यामागे आहे. सध्या सर्व राजकीय पक्षांमध्ये आणि शासनकर्त्यांमध्ये भ्रष्टाचाराने मूळ धरले असल्याने भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या अरविंद केजरीवालांचे हात बळकट करण्यासाठी आपण आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे, असे पांढरे यांनी नमूद केले.
दिल्ली विधानसभेतील ७० जागांपैकी पहिल्याच फटक्यात अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी’ला २८ जागांवर विजयी मजल मारता आली आहे. परंतु, दिल्लीत सत्तास्थापनेसाठी एकूण ३६ जागांच्या बहुमताची गरज आहे. यावर अरविंद केजरीवालांनी कोणत्याही पक्षाचे समर्थन घेणार नसल्याचे सांगून विरोधी पक्षात बसून काम करण्यास आवडेल असे मत व्यक्त केले आहे. 

Story img Loader