Pandharpur Ashadhi Ekadashi 2024 Maha Puja : राज्यासह देशभरातील सर्व वारकरी व विठुरायाचे भक्त गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते तो सोनियाचा दिवस उजाडला आहे. सर्व वारकरी आषाढी एकादशीची वाट पाहत असतात. आज तो दिवस उजाडला असून गेल्या काही दिवसांपासून दिंड्या-पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी देखील पंढरपुरात दाखल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक (लता शिंदे) ही शासकीय महापूजा पार पाडली. भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत असं विठुरायाचरणी साकडं घातलं.

हे ही वाचा >> पंढरी नगरीत भक्तांची मांदियाळी….आषाढीसाठी १२ लाखांहून अधिक भाविक, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा

लाखो वारकरी पंढरपुरात दाखल

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी …प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे… या अभंगाप्रमाणे लाखो भाविक पंढरीला आषाढी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून भाविक मोठ्या संख्यने पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर संतांच्या पालख्या देखील मोठ्या संख्येने पंढरपुरात पोहोचल्या आहेत. आषाढ दशमी म्हणजे मंगळवारी (१६ जुलै) पंढरी नगरीत जवळपास १२ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. आज ही संख्या दुप्पट झाली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागा भाविकांनी भरली आहे.