सोमवारी महाराष्ट्र दिनी (१ मे) मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी शिंदे गटासह भाजपावर सडकून टीका केली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते आशिष शेलारांवर जोरदार हल्लाबोल चढवला.
“बीकेसीतील मैदान छोटं आणि तिथे भोंगे मोठे” अशी टीका आशिष शेलारांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत ‘वज्रमूठ’ सभेत म्हणाले, “आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्राला प्रणाम करण्यासाठी ही वज्रमूठ सभा आहे. सभा प्रचंड आहे. ही सभा जेवढी इथं गच्च भरली आहे, त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट लोक संपूर्ण बीकेसीच्या अवतीभोवती उभे आहेत. आज सकाळीच मी ऐकत होतो. भाजपाचे मुंबईतील एक नेते सांगत होते की, मुंबईतील सर्वात लहान मैदानावर ही सर्वात लहान वज्रमूठ सभा होते आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, तुझे डोळे चिनी आहेत चिनी. त्यांचे डोळे असे बारीक आहेत.”
हेही वाचा- “तुझे डोळे चिनी आहेत चिनी, असे बारीक डोळे…”, संजय राऊतांचा ‘त्या’ भाजपा नेत्यावर हल्लाबोल
‘वज्रमूठ’ सभेनंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आले आहेत, त्याला हे लोक वज्रमूठ सभा वगैरे म्हणतात. ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न वज्रमूठ सभेतून केला जात आहे, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी टीकास्र सोडलं.
आशिष शेलार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, “आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आले आहेत, त्याला हे ‘वज्रमूठ’ वगैरे म्हणतात. पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपले नाही. गोळाबेरीज सुरूच आहे. दुसरं कारण म्हणजे मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ!”