महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा सांगली जिल्हा पिछाडीवर पडला असला तरी त्यांनी ज्या नक्षलग्रस्त भागाचे पालकत्व स्वीकारलेले आहे, त्या गडचिरोली जिल्ह्याने मात्र या मोहिमेत प्रथमच लक्षणीय कामगिरी नोंदविल्याची बाब पुढे आली आहे. २०११-१२ या वर्षांत या जिल्ह्यातील एकूण ८१ गावे ‘तंटामुक्त गाव’ म्हणून जाहीर झाली आहेत. त्यांना पुरस्काराच्या स्वरूपात तब्बल पावणेदोन कोटींचा निधी मिळणार आहे. या निमित्ताने, गडचिरोलीवासीयांनी आम्हाला शांतता व सुरक्षिततेचे वातावरण हवे असल्याची प्रचीती देत परिसरातील शांततेला सुरुंग लावणाऱ्या नक्षलवाद्यांना सणसणीत चपराक दिली आहे.
शासकीय मोहीम वा योजना राबविण्यास कायमच उदासीन राहणाऱ्या प्रशासनाच्या मानसिकेत यानिमित्ताने काहीसा बदल झाल्याचे दिसत आहे. सामाजिक शांतता व सुरक्षितता निर्माण करून स्थायी विकासाला चालना देण्याच्या भूमिकेतून शासन ही मोहीम राबवीत आहे. तिच्या अंमलबजावणीत मागील तीन ते चार वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये सापडलेला गडचिरोली जिल्हा मागे पडला होता. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता गेल्या काही वर्षांत फारसे प्रयत्न झाले नाहीत. पोलीस यंत्रणा सुरक्षिततेच्या कामात अडकून पडली असताना जिल्हा प्रशासनाने या कामात रस न दाखविल्याने ही स्थिती निर्माण झाली. परिणामी सर्वच बाबतीत मागासलेला हा भाग तंटामुक्तीच्या मोहिमेतही फारसे काही साध्य करू शकला नव्हता. या जिल्ह्याचे पालकत्व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वीकारल्यानंतर हे चित्र बदलवण्यासाठी पोलीस यंत्रणा कंबर कसून कामाला लागली. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. आधीच्या त्रुटींचा अभ्यास करून त्या सोडविण्यात आल्या. या सर्वाची फलनिष्पत्ती पाचव्या वर्षांत दृष्टिपथास आली आहे.
२०११-१२ या मोहिमेच्या पाचव्या वर्षांत जिल्ह्यातील एकूण ८१ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली. त्यात गडचिरोली तालुक्यातील आठ, चामोर्शी व कुरखेडा तालुक्यांतील प्रत्येकी १३, धानोरा १२, आरमोडी १, कोरची ७, देसाईगंज ४, अहेरी १०, भामरागढ ४, सिरोंचा ९ गावांचा समावेश आहे. या गावांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण एक कोटी ७४ लाख रुपये पुरस्काराच्या स्वरूपात मिळणार आहेत. याआधीच्या वर्षांत मोहिमेची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्याने सामोपचाराने तंटे मिटविण्यात गडचिरोली पिछाडीवर पडले होते. गावपातळीवर सामोपचाराने तंटे मिटविले गेले तरी त्यांची नोंद तंटामुक्त गाव समित्यांमार्फत योग्य पद्धतीने ठेवली जात नव्हती. ही बाब पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तंटामुक्त गाव समितीमार्फत काटेकोरपणे नोंदी ठेवल्या जाव्यात, याकरिता सदस्यांना प्रशिक्षण देण्याची मोहीम हाती घेतली. यामुळे सामोपचाराने तंटे मिटविण्याबरोबर त्यांच्या नोंदीही काळजीपूर्वक घेतल्या जाऊ लागल्या. त्याचा लाभ तंटामुक्तीसाठी पात्रतेचा निकष पूर्ण करताना झाला आहे. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी अविरत सतर्क राहणाऱ्या पोलीस यंत्रणेने लोकसहभागातून या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यश मिळविल्याचे अधोरेखित झाले आहे.
आबांनी पालकत्व निभावले; गडचिरोलीत ८१ गावे तंटामुक्त
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा सांगली जिल्हा पिछाडीवर पडला असला तरी त्यांनी ज्या नक्षलग्रस्त भागाचे पालकत्व स्वीकारलेले आहे, त्या गडचिरोली जिल्ह्याने मात्र या मोहिमेत प्रथमच लक्षणीय कामगिरी नोंदविल्याची बाब पुढे आली आहे.
First published on: 25-03-2013 at 03:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aba has done parental job 81 villages are dispute free in gadchiroli