जायकवाडीला पाणी देण्याबाबत लाभक्षेत्रात सुरू असलेला सर्व विरोध मोडून काढीत प्रशासनाने बुधवारी सकाळी ९ वाजता मुळा धरणाच्या सात दरवाजांतून मुळा नदीपात्रात पाणी सोडले. मोठय़ा बंदोबस्तात ही कार्यवाही करण्यात आली. साधारणपणे सहा दिवसांत ३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाईल.
बुधवारी सकाळी ९ वाजता प्रारंभी ५ हजार ६५० क्युसेक, नंतर त्यात वाढ करीत ६ हजार ८३० क्युसेस वेगाने पाणी नदीपात्रात झेपावले. धरणाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पाणी नदीपात्रात येताच राहुरी नगरपालिकेचा भोंगा बाजविण्यात आला. नदीकाठाच्या गावांना काल (मंगळवार) रात्रीच सावधानतेचा इशारा देण्यात आला होता.
काही संघटनांनी पाणी सोडण्याला विरोध केला तो पोलिसांनी हाणून पाडला. मुळा धरणात १७ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातून तीन टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्यात आल्याने धरणात केवळ १४ टीएमसी पाणी राहणार आहे. या पाण्यात पिण्याच्या पाण्याच्या योजना, औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, बाष्पीभवन, कॅ रीओव्हर, मृतसाठा आदीचा समावेश पाहता शेतीसिंचनाला पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याखालील लाभधारक शेतकरी मात्र पुरता हिरमुसला आहे.
जायकवाडी धरणात पाणी सोडू नये म्हणून मंगळवारी सर्वपक्षीय रास्ता रोको अंदोलन झाले. मुळा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे दरवाजे उघडे करून पाणी बाहेर काढले होते, ते पाणी प्रशासनाने बंद केले. गहू, हरभरा, चारापीके, ऊस, घास, ज्वारी आदी पिके पाण्याअभावी जळून जाण्याची भीती व्यक्त होत असून पुढील वर्षीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. एकही आवर्तन मिळण्याची चिन्हे नसल्याने शेती उजाड होण्याचा धोका आहे. आता धरणात पाणीच शिल्लक नसल्याचे कारण दाखवून शेतीला पाणी देण्याची प्रशासनाची मानसिकता नसल्याचे स्पष्ट होते. आज दुपारी दोन वाजता आमदार शंकर गडाख, आमदार शिवाजी कर्डिले, रामदास धुमाळ, रावसाहेब खेवरे, शिवाजी गाडे, अमृत धुमाळ यांच्यासह शेतकऱ्यांची आवर्तनाबाबत चुमेरी विश्रामगृहावर एक बैठक झाली. त्यात कोणताही निर्णय होऊ शकला नसल्याने नगर येथे बैठक घेण्याचे ठरले.
मुळा नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, मांजरी, वांजुळपोई, तर प्रवरा नदीपात्रातील रामपूर, कोल्हार, केसापुर, मांलुजे, पाथरे, लाख या बंधाऱ्यांत पाणी पूर्ण क्षमतेने भरून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रसाद तनपुरे यांनी केली आहे. धरणातून पाणी सोडण्याचा प्रशासनाने आपला हट्ट पूर्ण केल्याने शेतकरी संतप्त आहेत, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला. शिवसेना यापुढेही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
‘मुळा’तून जायकवाडीला पाण्याचा विसर्ग सुरू
जायकवाडीला पाणी देण्याबाबत लाभक्षेत्रात सुरू असलेला सर्व विरोध मोडून काढीत प्रशासनाने बुधवारी सकाळी ९ वाजता मुळा धरणाच्या सात दरवाजांतून मुळा नदीपात्रात पाणी सोडले. मोठय़ा बंदोबस्तात ही कार्यवाही करण्यात आली. साधारणपणे सहा दिवसांत ३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-11-2012 at 04:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abandonment from mula dam for jayakwadi