शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. शिंदे आपल्यासोबत ४० हून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेल्याचं समजत आहे. हे सर्व कटकारस्थान एकटे शिंदे करू शकत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याशिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही, असा खळबळजनक आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
“जोपर्यंत शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत येत नाहीत, तोपर्यंत कोणतंही मत व्यक्त करणं बरोबर नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याशिवाय आमदारांचं अपहरण होणं शक्य नाही,” असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या सर्व प्रसंगातून शिवसेना तावून सुलाखून निघेल. सीतेला एकदाच अग्रिपरीक्षा द्यावी लागली होती. शिवसेना अशा अग्निपरीक्षांना वारंवार सामोरं गेली आहे. स्वत: ला शिवसैनिक म्हणवून घेणारे कितीजण निष्ठेच्या अग्निपरीक्षेत पास होतात, हे भविष्यात दिसेल,” असंही राऊत म्हणाले.
विधानसभा बरखास्त करण्याबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, “जी परिस्थिती मला दिसत आहे, त्यानुसार विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं जात आहे. मी माझं मत व्यक्त केलंय ते फारसं चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. महाराष्ट्रात सध्या आमदारांवर दबाव आणणे, पळवापळवी करणे, प्रलोभने देणे, महाराष्ट्राच्या बाहेर नेवून त्यांच्यावर हल्ले करणे, या घटनांमुळे महाराष्ट्रातलं सरकार अस्वस्थ आहे. प्रमुख नेते अस्वस्थ आहेत. त्यामुळे भविष्यात काय वळण येईल, हे सांगू शकत नाही.”
पण अनेक राज्यात जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा साधारणपणे तेथील विधानसभा बरखास्त केली जाते आणि निवडणुकीला सामोरं जाण्याचा मार्ग स्वीकारला जातो. महाविकास आघाडी एकसंघ आहे. नक्कीच आमचे काही आमदार बाहेर आहेत. त्यातले एक आमदार नितीन देशमुख नागपुरला परतले आहेत. त्यांच्यासोबत काय प्रसंग घडला, त्यांनी जे काही सांगितलं, ते सर्व भयंकर आहे. गुवाहाटीत शिवसेनेचे जे आमदार बसलेत, ते विचार करतील, काहीजण विचार करत आहेत. ते नक्की आमच्या कुटुंबात परत येतील, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.