भारतरत्न पं. भीमसेन जोशी, भारतरत्न गंगुबाई हनगल यांच्यासारख्या दिग्गज गायकांची गायकी असलेल्या किराणा घराण्याचे गायक संगीतरत्न अब्दुल करीम खाँसाहेब यांचा अर्धपुतळा आज बांधकामाच्या राडारोडय़ाच्या ढिगाऱ्यात हरवला आहे. सांगली ब्रँिडगचे पालुपद आळवणाऱ्या प्रशासनाला हा पुतळा उजेडात आणावा आणि संगीताचा वारसा जगासमोर राहावा असे वाटत नाही, यासारखा कपाळकरंटेपणा दुसरा नसावाच. मिरजेचे नाव जगात एक संगीतनगरी म्हणून घेतले जाते ते केवळ संगीतरत्न अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या अजरामर गायकीमुळे. खाँसाहेबांच्या निधनानंतर नगरपालिकेने १९६१ मध्ये मध्यवर्ती बसस्थानक चौकामध्ये त्यांचा पुतळा उभा केला. १९८३ मध्ये रस्ता रुंदीकरणावेळी या पुतळ्याला कोपऱ्यावर जागा देण्यात आली. आता कोपऱ्यावर असलेला खाँसाहेबांचा पुतळा तसा कोणाच्या नजरेस येत नसला, तरी आजही काही संगीतातील दिग्गज मंडळी मिरजेत आली की पुतळ्याच्या दर्शनाला जातात. मात्र याच पुतळ्याजवळ एक मद्य विक्रीचे दुकान होते. चार वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणामध्ये हे दुकान हटविण्यात आले. सध्या या ठिकाणी बांधकाम सुरू असून बांधकामावेळी लागणारी खडी, मुरूम या पुतळ्याभोवती टाकला आहे. यामुळे संगीतातील एके काळचा सूर्य लोप पावत असला, तरी याची ना प्रशासनाला खेद ना जागा मालकाला खंत. याबाबत शनिवारी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंदच होता, तर उपायुक्त स्फूर्ती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पुतळा परिसर स्वच्छ करण्यास संबंधित ठेकेदाराला सांगण्यात आले असल्याचे म्हणाल्या. जागा मालकांने बांधकाम परवाना घेतला आहे का? पोलीस चौकीचे अतिक्रमण या ठिकाणी झाले आहे का? असे प्रश्न विचारले असता याबाबत बांधकाम परवाना गोखले नामक बिल्डरने घेतला असल्याचे सांगत मूळ जागा किती आहे, आणि अतिक्रमण आहे का हे तपासावे लागेल असे त्यांनी सांगितले. खाँसाहेबांचे शिष्य सवाई गंधर्व होते, त्यांच्या तालमीत गंगुबाई हनगल, पं. भीमसेन जोशी सारखे भारतरत्न तयार झाले. किराणा घराण्याच्या गायकीचा वारसा जपणारे हिराबाई बडोदेकर, सुरेश बापू माने, सरस्वतीबाई राणे, फिरोज दस्तुर, रोशनआरा बेगम, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, दशरथबुवा मुळे आदी दिग्गज याच घराण्यातील. या मंडळींच्या दादा गुरूंचा पुतळा आज कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आहे याचा ना कुणाला खेद ना कुणाला खंत.

 

Story img Loader