राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुळेंबद्दल प्रश्न विचारला असता सत्तार यांनी कॅमेरासमोरच सुप्रिया यांना शिवीगाळ केला. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया नोंदवताना अब्दुल सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे.
पाहा >> संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांनी प्रसारमाध्यमांसाठी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी या प्रकरणासंदर्भात एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये शेख यांनी सत्तार यांचा एकेरी उल्लेख करत आपला संताप व्यक्त केला आहे. “दहा पक्ष आणि दहा बाप बदलणारी ही सरड्याची औलाद अत्यंत खालच्या भाषेत सुप्रियाताईंबद्दल बोलतेय,” असं म्हणत शेख यांनी सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच सत्तार यांना इशारा देताना, “तुझ्या सत्तेची मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवल्याशिवाय राहणार नाही,” असंही शेख यांनी म्हटलं आहे.
शेख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रभर सत्तार यांच्या पुतळ्याचं दहन करुन निषेध नोंदवावा असं आवाहन केलं आहे. “महाराष्ट्रभर अब्दुल सत्तारच्या पुतळ्याला जोडे मारुन. त्याच्या पुतळ्याचं दहन करावं. तसेच सत्तारच्या दौऱ्यामध्ये सत्तेची मस्ती उतरवण्याची तयारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने करावी. याला धडा शिकवल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शांत बसू नये,” असंही शेख म्हणाले आहेत.
हेही वाचा >> अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?
नेमकं घडलं काय?
औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.